scorecardresearch

नवउद्यमींची ४२ अब्ज डॉलरची विक्रमी निधी उभारणी

भारतात प्रत्येक महिन्याला नवीन तीन ‘युनिकॉर्न’ची भर २०२१ सालात पडली आहे.

नवी दिल्ली : भारतातील प्रथितयश नवउद्यमी उपक्रमांनी (युनिकॉर्न) सरलेल्या २०२१ मध्ये (कॅलेंडर वर्ष) विक्रमी ४२ अब्ज डॉलरचा (सुमारे ३.१५ लाख कोटी रुपये) निधी गुंतवणूकदारांकडून उभा केला आहे. त्याआधीच्या वर्षांत अशा कंपन्यांनी ११.५ अब्ज डॉलरचा निधी उभारला होता, असे गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या ओरिओस व्हेंचर पार्टनर्सच्या अहवालातून समोर आले आहे.

नवउद्यमी (स्टार्टअप) उपक्रमशीलतेत ‘युनिकॉर्न’ म्हणजे एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक उलाढालीची पातळी गाठली जाणे आणि यशाचा एक महत्त्वाचा मानदंड आहे. भारतात प्रत्येक महिन्याला नवीन तीन ‘युनिकॉर्न’ची भर २०२१ सालात पडली आहे. हा यशाचा महत्त्वाचा टप्पा गाठणाऱ्या नवउद्यमींची एकूण संख्या डिसेंबर २०२१ अखेर वार्षिक तुलनेत दुप्पट होत ९० वर पोहोचली आहे. सरलेल्या वर्षांत त्यात ४६ नवउद्यमींची भर पडली, असे ओरिओस व्हेंचरच्या ‘द इंडियन टेक युनिकॉर्न रिपोर्ट २०२१’ या अहवालात म्हटले आहे. यामध्ये शेअरचॅट, क्रेड, मेशो, नजारा, मॉगलिक्स, एमपीएल, ग्रोफर्स (आता ब्लिंकिंट), अपग्रॅड, ग्लोबलबीज, अ‍ॅको, स्पिनी अशा कंपन्यांचा समावेश आहे. भारताने नवउद्यमी उपक्रमशीलतेत जगात तिसरे स्थान पटकावले आहे. या यादीमध्ये अमेरिका आणि चीन अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. अमेरिकेत सरलेल्या वर्षांत २५४ ‘युनिकॉर्न’ची नवीन भर पडली आणि त्यांची संख्या ४८७ वर पोहोचली आहे. तर त्यापाठोपाठ चीनमध्ये ७५ कंपन्यांची भर पडून, त्या देशात कार्यरत ‘युनिकॉर्न’ची संख्या ३०१ वर गेली आहे. भारतात नवउद्यमींसाठी अनुकूल वातावरण असून सध्या देशात ६०,००० हून अधिक नवउद्यमी कार्यरत आहेत. जागतिक स्तरावरील १३ पैकी एक नवउद्यमी भारतात असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

देशात फ्लिपकार्ट हा सर्वात मौल्यवान नवउद्यमी उपक्रम असून तिचे मूल्य ३७.६ अब्ज डॉलर आहे. तर मेनसा सर्वात जलद गतीने वाढणारी नवउद्यमी ठरली असून फक्त सहा महिन्यांच्या काळात कंपनीने एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक उलाढालीची पातळी गाठली आहे. भारतातील चार नवउद्यमी या डेकाकॉर्न म्हणजेच ज्यांनी दहा अब्ज डॉलरपेक्षा अधिक उलाढालीची पातळी गाठली अशा आहेत. त्यामध्ये फ्लिपकार्ट, पेटीएम, बायजू आणि ओयो रूम्स यांचा समावेश होतो.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Entrepreneurs raise a record 42 billion dollars zws

ताज्या बातम्या