शेअर बाजारात विलक्षण व अभूतपूर्व तेजीचा काळ राहिलेल्या एप्रिल ते जून २०१४ या तिमाहीने गेली काही वर्षे मरगळलेल्या म्युच्युअल फंड उद्योगाला अपेक्षित संजीवनी बहाल केल्याचे आढळून येत आहे. या तिमाहीत इक्विटी प्रकारातील फंडामध्ये तब्बल ८४ हजार नवीन गुंतवणूक खाते (फोलियो) सुरू करण्यात आले. जूनमध्ये तर इक्विटी फंडांनी विक्रमी ७,३०९ कोटींची नक्त गुंतवणुकीचा ओघ दाखविला आहे.
भांडवली बाजाराची नियंत्रक ‘सेबी’कडे उपलब्ध आकडय़ांनुसार, देशात सध्या कार्यरत ४४ म्युच्युअल फंडांच्या इक्विटी प्रकारातील फंडाच्या गुंतवणूकदार खात्यांची संख्या जून २०१४ अखेर २ कोटी ९२ लाख ६४,७३१ वर पोहचली आहे. जी मार्च २०१४ अखेर २ कोटी ९१ लाख ८०,९२२ अशी होती. म्हणजे तिमाहीत ८३,७९१ गुंतवणूकदार खात्यांची नव्याने भर पडली आहे. एप्रिलमध्ये तर ही संख्या २.९६ कोटींवर पोहोचली होती. म्हणजे गुंतवणूकदार खात्यांमध्ये केवळ महिन्याभरात तब्बल ४ लाखांहून अधिक वाढ ही इक्विटी फंडांनी चार वर्षांत प्रथमच अनुभवली आहे.
२००९च्या प्रारंभापासून जागतिक वित्तीय अरिष्टाच्या परिणामी शेअर बाजार गडगडल्याने इक्विटी म्युच्युअल फंडांमधून गुंतवणूकदारांचे निरंतर पलायन सुरू असल्याचा कटू अनुभव या उद्योगाने घेतला आहे. मार्च २००९ मध्ये इक्विटी फंडामध्ये सर्वोच्च ४.११ कोटी इतकी गुंतवणूक खाती नोंदविली गेली आहेत. मार्च २००८ मध्ये त्यांचे प्रमाण ३.७७ कोटी इतके होते. त्या तुलनेत सध्याचे प्रमाण हे तब्बल दीड कोटी गुंतवणूकदार खात्यांच्या तुटीचे आहे.