scorecardresearch

म्युच्युअल फंड गंगाजळी ३८.८९ लाख कोटींवर ; एप्रिलमध्ये ‘इक्विटी’ फंडात १५,८९० कोटींचा ओघ

नियोजनबद्ध गुंतवणूक पर्याय असलेल्या एसआयपीच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक एप्रिलमध्ये ११,८६३ कोटींवर पोहोचली आहे.

मुंबई :  भांडवली बाजारातील वाढलेली अस्थिरता  आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (एफपीआय) भांडवली बाजारातून निधीचे निर्गमन सुरू असूनदेखील समभागसंलग्न म्युच्युअल फंडांमध्ये (इक्विटी) एप्रिल महिन्यात १५,८९० कोटी रुपयांचा ओघ आला आहे. म्युच्युअल फंड उद्योगातील एकूण व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता (एयूएम) ३८.८९ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. जी मार्च महिन्यात ३७.७ लाख कोटी होती.

‘अ‍ॅम्फी’ने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, समभागसंलग्न (इक्विटी) म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचा भरभरून सुरू असलेला ओघ सरलेल्या एप्रिलमध्येही कायम आहे. मात्र मार्च महिन्यात २८,४६३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. त्या तुलनेत एप्रिलमध्ये प्रवाह कमी झाला आहे, मात्र सलग चौदाव्या महिन्यात म्युच्युअल फंडांमध्ये पैशाचा प्रवाह सकारात्मक राहिला आहे. आधीच्या फेब्रुवारी महिन्यात १९,७०५ कोटी रुपये, जानेवारीमध्ये १४,८८८ कोटी रुपये आणि डिसेंबर २०२१ मध्ये २५,०७७ कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक आली होती. तर त्याआधी म्हणजेच जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२१ या आठ महिन्यांच्या कालावधीत इक्विटी फंडातून ४६,७९१ कोटी रुपयांचा निधी काढून घेतला होता.

नियोजनबद्ध गुंतवणूक पर्याय असलेल्या एसआयपीच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक एप्रिलमध्ये ११,८६३ कोटींवर पोहोचली आहे. जी त्याआधीच्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये १२,३२८ कोटी रुपये नोंदवली गेली होती.

मात्र असे असूनही एसआयपी खात्यांच्या संख्येने एप्रिलमध्ये ५.३९ कोटींचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. सरलेल्या महिन्यात त्यात ११.२९ लाख नवीन खात्यांची भर पडली आहे.

रोखे संलग्न म्युच्युअल फंडात सरलेल्या एप्रिल महिन्यात ६९,८८३ कोटींची गुंतवणूक नोंदली गेली आहे. याबरोबर गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडांमध्ये १,१०० कोटींची भर पडली आहे.

म्युच्युअल फंड क्षेत्रासाठी नवीन आर्थिक वर्षांची सकारात्मक सुरुवात झाली आहे. एप्रिल महिन्यात बाजारात मोठय़ा प्रमाणावर अस्थिरता असूनही, किरकोळ गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील विश्वास अधिक वाढला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने रेपोदरात वाढ केल्यामुळे गुंतवणूकदारांनी कमी कालावधीच्या रोखेसंलग्न  योजनांमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. 

– एन. एस. व्यंकटेश,  मुख्य कार्यकारी अधिकारी, अ‍ॅम्फी

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Equity mutual funds see 15890 crore inflow in april zws

ताज्या बातम्या