मुंबई : आयातपर्यायी महत्त्वाच्या पूरक रसायनांची निर्मिती करणाऱ्या ‘इथर इंडस्ट्रीज’ची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या २४ मेपासून खुली होत असून गुंतवणूकदारांना २६ मेपर्यंत अर्ज करता येईल. कंपनीने विक्रीसाठी प्रति समभाग ६१० रुपये ते ६४२ रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे.

या भागविक्रीच्या माध्यमातून कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक त्यांचा भांडवली हिश्शाच्या आंशिक विक्रीच्या माध्यमातून २८.२ लाख समभाग विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत, तर ६२७ कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करण्यात येणार आहे. यातून कंपनीचा ८०८ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस आहे. या निधीचा उपयोग नवीन प्रकल्पासाठी भांडवली खर्चाची तरतूद, खेळत्या भांडवलासाठी आणि कर्ज परतफेडीसाठी केला जाईल. प्रारंभिक समभाग विक्रीनंतर कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहे.

वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान २३ आणि त्यानंतरच्या २३च्या पटीत समभागांसाठी बोली लावून, कंपनीच्या या भागविक्रीत सहभागी होता येईल. इथर इंडस्ट्रीज ही भारतातील एक विशेष रसायन उत्पादक कंपनी आहे. औषधी निर्माण आणि ऊर्जा आणि तेल क्षेत्रातील कंपन्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कंपनीकडून विशेष आणि पूरक रसायनांची निर्मिती केली जाते.