युरोपातील १९ देशांचा संघ अर्थात युरोझोन एकसंधतेला आव्हान निर्माण झाले असताना, या देशांचे सामायिक चलन युरो नऊ वर्षांच्या नीचांकाला गडगडला. सोमवारच्या व्यवहारात युरोने अमेरिकी डॉलरपुढे १.१८६०५ अशा मार्च २००६ च्या पातळीवर लोटांगण घेतले, तर मंगळवारच्या प्रारंभिक व्यवहारात तो सावरत असल्याचे आढळून आले नाही.
सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जात असलेल्या ग्रीसच्या युरोझोनमधील अस्तित्वाबद्दल वाढलेली अनिश्चितता, जर्मनीतील चलनवाढीची जाहीर झालेली नकारात्मक आकडेवारी आणि या परिणामी ढासळत्या अर्थव्यवस्थेला टेकू देण्यासाठी युरोपीय मध्यवर्ती बँकेकडून (ईसीबी) नोटांच्या छपाईचा उपाय योजला जाण्याची शक्यता या बाबी युरोच्या वाताहतीला कारणीभूत ठरल्या.
एकसंध युरोझोनच्या भवितव्याच्या दृष्टीने जगभरच्या बाजार-विश्लेषकांच्या नजरा नजीकच्या काळातील दोन घटनांवर एकवटल्या आहेत. २२ जानेवारी रोजी होत असलेल्या ईसीबीच्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत होणारे निर्णय आणि २५ जानेवारीला ग्रीसमध्ये होणाऱ्या मतदानांवर सर्वाचे लक्ष असेल. ‘ईसीबी’कडून आर्थिक चालना देणारे ‘क्वाटिंटेटिव्ह इझिंग’ची घोषणा होण्याचे कयास आहेत. त्या उलट ग्रीसमध्ये जनमत डाव्या विचारसरणीच्या सिरीझा पक्षाच्या बाजूने झुकताना दिसत असून, त्या पक्षाला निवडणुकांमध्ये बहुमत मिळाल्यास, युरोझोनने लादलेल्या काटकसर व करवाढीचे उपाय झुगारून ग्रीसकडून सामायिक चलन- युरोशी बांधीलकीही नाकारली जाण्याची शक्यता विश्लेषक व्यक्त करीत आहेत.