अशक्त रुपयामुळे निर्यात वाढली; आयातही महागली

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक वस्तू, पेट्रोलियम उत्पादने आणि रसायने यासारख्या उद्योग क्षेत्रांनी चांगली कामगिरी केल्यामुळे आणि रुपयाच्या विनिमय मूल्यातील तीव्र घसरणीने हातभार लावल्याने सरलेल्या एप्रिलमध्ये भारताच्या व्यापारी मालाची निर्यात ३०.७ टक्क्यांनी वाढून ४०.१९ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी झाली. तथापि आर्थिक वर्षांच्या या पहिल्या महिन्यात व्यापार तूटही चिंताजनक २०.११ अब्ज डॉलर नोंदविली गेल्याचे वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.

एप्रिलमध्ये आयातीवरील खर्चदेखील ३०.९७ टक्क्यांनी वाढून ६०.३ अब्ज डॉलर झाला आहे. परिणामी आयात-निर्यातीतील तफावत अर्थात आयात तूट २०.११ अब्ज डॉलरवर गेली आहे. गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल २०२१ मध्ये निर्यात मंदावली असतानाही व्यापार तूट १५.२९ अब्ज डॉलपर्यंत मर्यादित होती. एप्रिलमध्ये पेट्रोलियम आणि खनिज तेलाची आयातीवरील खर्च तब्बल ८७.५४ टक्क्यांनी वाढून २०.२ अब्ज डॉलर झाला आहे.