आयातही वाढल्याने व्यापार तुटीत विस्तार

देशाची गेल्या महिन्यातील निर्यात ४.३९ टक्क्यांनी वाढून २३.५६ अब्ज डॉलर झाली आहे. मात्र याच कालावधीत आयातीत १९ टक्के वाढ झाल्याने व्यापाररूपी तूट विस्तारली आहे.

रसायन, अभियांत्रिकी क्षेत्रातील वस्तूंना असलेल्या मागणीमुळे जूनमधील निर्यात वाढली आहे.

तर गेल्या महिन्यात आयात मात्र १९ टक्क्यांनी वाढून ३६.५२ अब्ज डॉलर झाली आहे. यामुळे आयात-निर्यातीतील दरी मानली जाणारी व्यापार तूट १२.९६ अब्ज डॉलरवर गेली आहे. वर्षभरापूर्वी, जून २०१६ मध्ये ८.११ अब्ज डॉलरची व्यापार तूट होती.

काळे व पिवळ्या सोन्याच्या वाढत्या आयातीमुळे यंदा व्यापार तूट वाढली आहे. गेल्या महिन्यात सोने आयात वाढून २.४५ अब्ज डॉलरची झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत सोने आयात १.२० अब्ज डॉलरची होती. तर यंदा तेल आयात वाढून ८.१२ अब्ज डॉलरची झाली आहे. वर्षभरात त्यात १२.०४ टक्के वाढ झाली आहे.

एप्रिल ते जून या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत निर्यात १०.५७ टक्क्यांनी वाढून ७२.२१ अब्ज डॉलर, तर आयात ३२.७८ टक्क्यांनी वाढत ११२.२ अब्ज डॉलर झाली आहे. यामुळे तिमाहीत व्यापार तूट ४० अब्ज डॉलर नोंदली गेली आहे.