पीटीआय, नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांत देशाने इतिहासात पहिल्यांदाच ४०० अब्ज डॉलरच्या निर्यातीचा टप्पा गाठला आहे. पेट्रोलियम उत्पादने, अभियांत्रिकी, रत्ने-दागिने आणि रसायने यांसारख्या प्रमुख क्षेत्रांच्या सकारात्मक कामगिरीमुळे निर्यात ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले.

विद्यमान २०२१-२२ आर्थिक वर्षांत, २१ मार्चपर्यंत भारताच्या निर्यातीत आधीच्या वर्षीच्या तुलनेत ३७ टक्क्यांची वाढ होत, ती ४००.८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गत आर्थिक वर्षांत २९२ अब्ज डॉलरची निर्यात नोंदविली गेली होती. याआधी निर्यातीने २०१८-१९ मध्ये ३३०.०७ अब्ज डॉलरचा उच्चांक गाठला होता. चालू आर्थिक वर्षांत वस्तू आणि सेवांची आयातदेखील वाढून ५८९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. यामुळे दोहोंतील तफावत अर्थात व्यापार तूट १८९ अब्ज डॉलरवर गेली आहे.

आर्थिक वर्ष संपण्याच्या नऊ दिवस आधीच निर्यातीचे सर्वोच्च लक्ष्य गाठले गेले. देशाच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, विणकर, एमएसएमई उद्योजक, उत्पादक, निर्यातदार यांचे कौतुक केले. तर करोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धासह सर्व संकटांना तोंड देत भारताने निर्यातीचा विक्रमी टप्पा गाठला आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल म्हणाले.