पीटीआय, नवी दिल्ली : आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून ‘भारतपे’ने त्यांचे अडचणीत सापडलेले सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांच्या पत्नी माधुरी जैन-ग्रोव्हर यांचीही कंपनीतून बुधवारी हकालपट्टी केली. त्या ऑक्टोबर २०१८ पासून त्या कंपनीच्या आर्थिक नियंत्रणे विभागाच्या प्रभारी होत्या. माधुरी जैन-ग्रोव्हर यांनी बनावट पावत्या तयार करणे आणि वैयक्तिक कारणासाठी आणि परदेशातील सहलींसाठीची अवाजवी खर्च केल्याचे आरोप करत, कंपनीने त्यांच्यावर कथित आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवला आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी मंगळवारी या हकालपट्टीची पुष्टी केली. याचबरोबर त्यांच्याशी निहित हितसंबंध असणाऱ्या ५६ कर्मचाऱ्यांसह, एकूण ३०० कर्मचाऱ्यांचे ईसॉप अर्थात एम्प्लॉइ स्टॉक ऑप्शन रद्द केले आहे, अशी माहितीही भारतपेकडून देण्यात आली.

कोटक मिहद्रा बँकेच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरल्याचा आणि फसवणूक केल्याच्या आरोपांनंतर अशनीर ग्रोव्हर हे चालू वर्षांत जानेवारीपासून मार्च २०२२ अखेपर्यंत ऐच्छिक रजेवर गेले आहेत. त्यांनतर लगेचच त्यांच्या माधुरी यांनाही रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशनीर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. वृत्तसंस्थेकडून माधुरी यांची बाजू ऐकून घेण्यासाठी धाडण्यात आलेल्या ई-मेल संदेशांना त्यांनी उत्तर देण्याचे टाळले आहे. माधुरी यांनी कंपनीबाबत गोपनीय माहिती त्यांचे वडील आणि भावामार्फत दुसऱ्या कंपनीला पुरविली असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच एप्रिल २०२१ मध्ये लेझर जेनेसिस आणि क्लियरलिफ्ट या चेहऱ्याशी संबंधित उपचाराचा खर्च आणि स्वत:च्या निवासस्थानासाठी एलईडी टीव्ही आणि फ्रीज खरेदी करून तो खर्च कंपनीकडून घेण्यात आल्याचा ठपकाही त्यांच्यावर आहे. याचबरोबर कुटुंबातील सदस्यांनी अमेरिका आणि दुबईतील सहलींवर केलेला खर्च त्यांनी कंपनीकडून वसूल केल्याचे आरोपांमध्ये नमूद आहे.