सलग तिसऱ्या व्यवहारात घसरण नोंदविताना सेन्सेक्स बुधवारी २७ हजारांच्या उंबरठय़ावर येऊन विसावला. २१३.६८ अंश घसरणीसह मुंबई निर्देशांक २७,०३९.७६ वर स्थिरावला. तर ६१.७० अंश घसरणीमुळे निफ्टीला त्याचा ८,२०० स्तर सोडत ८,१७१.२० वर थांबावे लागले. प्रमुख निर्देशांक आता त्यांच्या १५ ऑक्टोबरच्या उच्चांकी टप्प्यापासून ढळले आहेत. सप्ताहारंभापासून बाजारात निर्देशांकांची घसरण सुरू आहे. सलग तीन व्यवहारांतील एकूण घसरणीमुळे सेन्सेक्स ४३१.०५ अंशांनी खाली येत आता थेट २७ हजारांनजीक आला आहे. अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या बुधवारी संपणाऱ्या बैठकीचे फलित आणि गुरुवारी बाजारात होणाऱ्या महिन्याच्या वायदापूर्तीचे व्यवहार या दरम्यान बुधवारचे घसरणीचे व्यवहार नोंदले गेले. सेन्सेक्समधील अॅक्सिस बँकेने ७ टक्क्यांची दोन महिन्यांतील मोठी आपटी अनुभवली. ४.३० टक्के घसरणीने आयसीआयसीआय बँकेनेही महिन्यातील तळ गाठला.