ऑगस्टमध्ये घसरून ५.३ टक्क्यांवर

किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराने गेल्या काही महिन्यांतील चढत्या क्रमापासून फारकत घेऊन दिलासा दिला आहे. मुख्यत: अन्नधान्य किमतीतील घसरणीने सरलेल्या ऑगस्टमधील महागाईचा दर ५.३ टक्क्यांवर नरमल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट केले.

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर जुलैमध्ये ५.५९ टक्के होता. तर गेल्यावर्षी याच कालावधीदरम्यान (ऑगस्ट २०२०) तो ६.६९ टक्के नोंदवण्यात आला होता.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (एनएसओ) प्रसृत आकडेवारीनुसार, अन्नधान्य पदार्थांचा महागाईचा दर ऑगस्टमध्ये ३.११ टक्के होता, जो त्याआधीच्या महिन्यात ३.९६ टक्के होता.

रिझर्व्ह बँकेने नुकत्याच झालेल्या द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीनंतर, व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले होते. शिवाय किरकोळ महागाई दराचे प्रमाण हे २०२१-२२ या आर्थिक वर्षात सरासरी ५.७ टक्क्यांवर राहण्याचा कयासही मध्यवर्ती बँकेने व्यक्त केला आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये ५.९ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ५.३ टक्के आणि चौथ्या तिमाहीत तो ५.८ टक्के राहण्याचा तिचे अनुमान आहे. तर २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत तो ५.१ टक्के राहील, असे तिने अंदाजले आहे.

नरमाईचे कारण काय?

महागाई दरातील या नरमाईसाठी प्रामुख्याने अन्नधान्याच्या किमतीत झालेली घट कारणीभूत ठरल्याचे ‘एनएसओ’ची आकडेवारीनुसार, मासिक आधारावर अंडी, मांस, मासे, फळे, कडधान्ये आणि तृणधान्ये स्वस्त झाली. खाद्य तेलातील महागाईने मात्र चिंतेत भर घातली आहे. वार्षिक आधारावर खाद्य तेलाच्या दरात ३३ टक्क्यांची वाढ झाली.  तर दूध, तेल, भाज्या, साखर आणि मसालेही महागले.