मुंबई : तांत्रिक दोषामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्राप्तिकर विभागाचे संकेतस्थळाचे कामकाज आता रुळावर आले असून, प्राप्तिकर विवरणपत्र सादर करणाऱ्या करदात्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे प्राप्तिकर विभागाकडून सांगण्यात आले. २०२०-२१ मध्ये आतापर्यंत २.३८ कोटी करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरले गेले आहेत, अशी प्राप्तिकर विभागाने मंगळवारी माहिती दिली.

दाखल विवरणपत्रांमधून, प्राप्तिकर विभागाकडून आतापर्यंत १.६८ कोटीपेक्षा अधिक करदात्यांबाबत परताव्याची (रिफंड) प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर ६४ लाखांहून अधिक प्रकरणांमध्ये परतावा (रिफंड) करदात्यांच्या खात्यात जमाही करण्यात आला आहे. ज्या करदात्यांनी आतापर्यंत आर्थिक वर्ष २०२१-२२ चे विवरणपत्रे भरलेले नाही, त्यांनी ते भरावे असे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे. वैयक्तिक करदात्यांसाठी विवरणपत्र सादर करण्याची सुधारित अंतिम तारीख ३१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. 

सरकारने विवरणपत्रे भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ दिली आहे. करोना संसर्गामुळे याआधी सरकारने विवरणपत्रे भरण्याची नियमित मुदत ३१ जुलैवरून, ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. तर प्राप्तिकर विभागाने ७ जून २०२१ ला नवीन ई-फायलिंग संकेतस्थळाचे अनावरण केले होते. मात्र करदात्यांना या संकेतस्थळावर विवरणपत्रे भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी विवरणपत्र भरण्याला मुदतवाढ देणे सरकारला भाग ठरले.