वस्तू आणि सेवा करमुळे (जीएसटी) ग्राहकांना एक लाख कोटींचा नफा झाला असून इन्स्पेक्टर राजही संपुष्टात आलं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. अर्थसंकल्प मांडत असताना जीएसटीची माहिती देताना निर्मला सीतारामन यांनी दिवंगत भाजपा नेते अरुण जेटली यांची आठवण काढली. जीएसटी लागू करणारे माजी अर्थमंत्री अरुण जेटली आज आपल्यात नाहीत असं सांगत निर्मला सीतारामन यांनी श्रद्धांजली वाहिली.

देशातील जनतेच्या सेवेसाठी, एक देश-एक टॅक्स योजना सरकारने आणली. जीएसटी उत्पन्न सातत्याने वाढत आहे. एक लाख कोटींचा आकडा पूर्ण केला आहे अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. जीएसटी हा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय असून आम्ही ६० लाख नवीन करदात्यांची भर घातली. ४० कोटी व्यक्ती जीएसटी परतावा भरतात असंही त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा – Budget 2020 : अर्थसंकल्पात ‘सबका साथ, सबका विकास’वर लक्ष केंद्रीत – अर्थमंत्री

जीएसटीमुळे देशाला फायदा झाला असून वस्तूंवरील कर कमी झाला. लघू आणि मध्यम उद्योगांना फायदा झाला असल्याचं यावेळी निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.