देशावर ओढवलेल्या करोनाच्या संकटामुळे आर्थिक चक्र ठप्प झालं असून, केंद्र सरकारकडून आर्थिक नियोजनासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहे. केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि निवृत्तीधारकांच्या वेतनसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना देय असलेला महागाई भत्त्याचा अतिरिक्त हफ्ता आणि निवृत्तीवेतनाचा भत्ता देण्याचा निर्णय सरकारनं तूर्तास थांबवला आहे. त्यामुळे चालू वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना हे भत्ते मिळणार नाही, असं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

करोनामुळे देशासमोर कठीण प्रसंग उभा आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्रानं लॉकडाउनचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे करोनाच्या प्रसाराच्या वेगाबरोबर अर्थचक्रही ठप्प झालं आहे. याचा परिणाम सरकारच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसूलावर झाला आहे. त्यामुळे सरकारनं काटकर करण्यास सुरूवात केली आहे.

सरकारनं जास्तीच्या खर्चाला कात्री लावण्याबरोबरच केंद्र सरकारच्या अखत्यारित येणार कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त महागाई भत्त्याचा हफ्ता तूर्तास थांबवला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं याबाबत माहिती दिली आहे. “१ जानेवारीपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यापोटी देय असलेला अतिरिक्त हफ्ता त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारकांना महागाईपोटी दिला जाणाऱ्या भत्त्याचा अतिरिक्त हफ्ता दिला जाणार नाही. तसेच १ जुलै २०२० पासून ते १ जानेवारी २०२० पर्यंतचे महागाई भत्त्याचे अतिरिक्त हफ्ते दिले जाणार नाही,”असं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे.

मात्र, केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जाणार डीए आणि निवृतीवेतनधारकांना दिला जाणार डीआर सध्याच्या लागू असलेल्या टक्क्याप्रमाणेच दिला जाईल, असंही अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही रक्कम थेट पुढच्या वर्षीच हातात मिळणार आहे.