नियमानुसार आवश्यक ४०० कोटी गुंतवणुकीची पूर्तता करून लवकरच पेमेंट बँकेचे कामकाज सुरू करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडे अंतिम मंजुरीसाठी अर्ज करण्याचे फिनो पेटेकने जाहीर केले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने आखून दिल्याप्रमाणे बहुतांश भांडवल देशातूनच उभे करण्याच्या अटीचे पालन फिनोकडून करण्यात आले आहे. जुलै २०१६ मध्ये भारत पेट्रोलियम कंपनीने फिनो पेटेकच्या भांडवलात २५१ कोटी रुपयांची गुंतवणूक करून २१ टक्के भागीदारी घेतली होती व नुकतीच आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स व आयसीआयसीआय लॉम्बार्ड व इतर दोन कंपन्यांनी १४९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सरकारच्या आर्थिक सर्वसमावेशक मोहिमेचा विस्तार म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेने पेमेंट बँका ही संकल्पना अस्तित्वात आणली आहे छोटय़ा स्वरूपातील बँकेतील ठेवी तसेच देयक व्यवहारासाठी ही यंत्रणा उभी राहणार असून, या क्षेत्रातील बँका प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने देशाच्या बँकिंग नसलेल्या- दुर्गम तसेच ग्रामीण भागांत विविध सेवा पुरविणार आहेत, यामध्ये मोबाइल, इंटरनेट तसेच अन्य उपकरणांच्या माध्यमातून वित्तविषयक सेवा पुरविल्या जातील. विविध देयके भरण्यासह विमा योजना, म्युच्युअल फंड तसेच निवृत्ती लाभ योजना पेमेंट बँकांना तिच्या ग्राहकांना देता येईल.

याविषयी अधिक माहिती देताना फिनो पेटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक ऋषी गुप्ता म्हणाले, भारत पेट्रोलियम व आयसीआयसीआय समूहाने दाखविलेल्या विश्वासामुळे फिनोला पेमेंट बँक म्हणून महत्त्वाची भूमिका निभावता येणार आहे. २००६ सालापासून फिनो भारतातील ५०० जिल्ह्य़ामधील ग्रामीण व दुर्गम भागात कार्यरत आहे. फिनो पेटेकने ‘बी पे’ या  मोबाइल वॉलेटची सुरुवात केली असून भारतातील १२,००० पेट्रोलपंपावर त्यायोगे रोकडरहित व्यवहार केले जाणार आहेत.