नवी दिल्लीदेशातील प्रत्येक नागरिकाचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाधारित वित्तीय उपक्रमांनी आता ‘फिनटेक क्रांती’चे रूप घेण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे अधोरेखित केली. या तंत्रज्ञानाधारित वित्तीय सेवांच्या (फिनटेक) उपक्रमांनी नवोन्मेषी प्रयोग म्हणून सुरुवात करीत मोठे सुयश मिळविले आणि लोकांमधून स्वीकारार्हता मिळविली, असे गौरवोद्गार त्यांनी इन्फिनिटी फोरम या परिसंवादाच्या उद्घाटकीय भाषणात काढले.

तंत्रज्ञानामुळे अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडून येत आहे, यावर भर देऊन पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या वर्षी एटीएममधून जितकी रोख काढली गेली, त्यापेक्षा किती तरी अधिक रकमेचे व्यवहार हे मोबाईल फोनवरील डिजिटल देयक व्यासपीठावरून झाले आहेत. कोणत्याही भौतिक शाखांविना पूर्णपणे डिजिटल बँका अस्तित्वात येऊन, आजवर कल्पनेत असलेली वास्तवात आली आहे. आगामी दशकभरापेक्षा कमी कालावधीत डिजिटल बँकांनाच सामान्य रूप आलेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘डिजिटल इंडिया’अंतर्गत हाती घेतल्या गेलेल्या परिवर्तनकारी उपक्रमांमुळे नावीन्यपूर्ण ‘फिनटेक’ उपाययोजनांसाठी शासनाचे दरवाजे उघडले गेल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.