मुंबई : केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या उद्दिष्टाप्रमाणे देशाच्या अर्थव्यवस्थेने पाच लाख कोटी डॉलरचे उद्दिष्ट गाठण्याआधीच, देशाच्या भांडवली बाजाराचे एकूण बाजारमूल्य मात्र सध्याच्या ३.५ लाख कोटी डॉलरवरून ५ लाख कोटी डॉलरचा टप्पा २०२४ पर्यंत  गाठेल, असे चित्र निर्माण झाले आहे. गुंतवणूकदारांना आजमावत प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्रीसह बाजाराला धडक देणाऱ्या नवनवीन कंपन्यांचा धडाका पाहता, हे लक्ष्य समीप दिसत आहे.

कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्रीचा आवेग लक्षात घेता २०२१-२२ आर्थिक वर्ष हे या माध्यमातून निधी उभारणीबद्दल संस्मरणीय वर्ष ठरल्याचे रिझव्र्ह बँकेनेही अलीकडच्या टिपणांत मान्य केले आहे. चालू वर्षात कंपन्यांनी आतापर्यंत दहा अब्ज अमेरिकी डॉलरचा निधी उभारला आहे. जो गेल्या तीन वर्षांमध्ये आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या निधीच्या तुलनेत अधिक आहे, असे  गोल्डमन सॅक्सने प्रसिद्ध केलेल्या टिपणात म्हटले आहे.

भागविक्रीतून भांडवल उभारणाऱ्या कंपन्यांच्या संख्येने उच्चांकी पातळी गाठलीच आहे, त्यांना मिळालेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद, आतापर्यंत उभारला गेलेला आणि उर्वरित काळातील संभाव्य निधी उभारणी अशा सर्वच पैलूंबाबत या वर्षांची कामगिरी अभूतपूर्वच आहे. अलीकडच्या काही महिन्यांत, नवउद्यमी (स्टार्टअप) कंपन्यांनी ‘आयपीओ’च्या माध्यमातून भांडवली उभारणी करण्याचा सपाटा लावला आहे आणि त्यात त्यांना दमदार यशही मिळत आहे. यामुळे येत्या १२-२४ महिन्यांच्या काळात ‘आयपीओ’च्या माध्यमातून आणखी मोठी भांडवली उभारणी बघायला मिळेल.

सध्या ‘युनिकॉर्न’ म्हणजेच एक अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत व्यावसायिक पसारा वाढविणाऱ्या यशस्वी कंपन्या असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. तर गेल्या आठवड्यात भारताने फ्रान्सला मागे टाकत सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक बाजार भांडवल असलेला देश म्हणून स्थान कमावले आहे.

येत्या दोन-तीन वर्षांत ‘आयपीओ’च्या माध्यमातून ४०० अब्ज डॉलरच्या बाजार भांडवलाची भर पडण्याची शक्यता आहे. २०२४ पर्यंत भारताचे बाजार भांडवल सध्याच्या ३.५ लाख कोटी डॉलरवरून वाढून ५ लाख कोटी डॉलरवर पोहोचण्यास तेच मुख्यत: कारणीभूत ठरेल. तसेच सर्वाधिक बाजार भांडवल असणाऱ्या देशांच्या यादीत भारत पाचवे स्थान गाठेल.’

’  ‘गोल्डमन सॅक्स’चे टिपण