स्पर्धेत तग धरण्यासाठी खर्चावर नियंत्रणाची उपाययोजना
देशातील सर्वात मोठा ई-व्यापार मंच असलेल्या फ्लिपकार्टने खर्चात काटकसरीचे नियोजन आखले आहे. व्यवस्थापनाच्या या धोरणाचा फटका कंपनीतील ७०० कर्मचाऱ्यांना बसणार असून त्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे.
महसूल तसेच व्यवहारानुसार फ्लिपकार्ट ही भारतातली सर्वात मोठी ई-कामर्स कंपनी मानली जाते. अ‍ॅमेझॉन तसेच स्नॅपडिलशी तिला सध्या कट्टर सामना करावा लागत आहे. असे करताना खर्चातील कपात म्हणून कंपनीने तिच्या ताफ्यातील ७०० कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचे निश्चित केले आहे.
कंपनीच्या ताफ्यातील एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण ३ टक्के आहे. ‘अपेक्षेनुरूप कामगिरी नसणाऱ्या’ कर्मचाऱ्यांना स्वत:हून राजीनामा देण्यास अथवा कपातीला सामोरे जाण्यास सांगण्यात आल्याचे कळते. कपात करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १,००० वरही जाऊ शकते, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
बंगळुरूस्थित फ्लिपकार्टमधील टी रॉ प्राईससारख्या गुंतवणूकदार व्यवस्थापनाचा उत्साह कमी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यातच कंपनीने भारतीय प्रौद्योगिक संस्थांमधील (आयआयटी) विद्यार्थ्यांना सेवेत घेण्याचे प्रमाण कमी केले आहे. कंपनीत गेल्या काही महिन्यांपासून मोठय़ा प्रमाणावर बदल होत आहे. नेतृत्वातील फेररचनेसह मंचावर स्थान देण्यात येणाऱ्या विक्रेत्यांच्या सवलती कमी करण्याचे धोरणही यापूर्वी अनुसरले गेले आहे.
याचाच भाग म्हणून कर्मचाऱ्याच्या कामगिरीचे अवलोकन करण्यात येत असल्याचे स्पष्ट करतानाच कंपनीच्या प्रवक्त्याने कपातीचा नेमका आकडा मात्र सांगितला नाही. अपेक्षित कामगिरी न बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना अन्य मार्ग उपलब्ध आहेत, असेही प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला सांगितले. इंटरनेटसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानावर विसंबून असलेल्या अशा उद्योगात कर्मचारी कपातीसारखा निर्णय म्हणजे फार काही वेगळे नाही, असेही त्याने नमूद केले.