वॉशिंग्टन : देशातील विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून सर्व संभाव्य समस्यांचे निराकरण करेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी गुंतवणूकदारांच्या परिषदेत बोलताना आश्वासन दिले.

सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून सॅन फ्रान्सिस्को येथे ‘इन्व्हेिस्टग इन इंडियाज् डिजिटल रेव्होल्यूशन’ या विषयावरील परिषदेला संबोधित करताना, केंद्र सरकार परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गुंतवणूकदारांच्या समस्या समजून घेऊन जेथे शक्य असेल तेथे आवश्यक ते बदल करण्याची तयारी असल्याचे सांगितले.

भारतातील नवउद्यमी परिसंस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सक्रिय नवउद्यमी कक्षाची स्थापना केली आहे आणि भारतीय नवउद्यमींमध्ये स्वारस्य असलेल्यांना या कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन सीतारामन यांनी केले. भारताने २०२३ पर्यंत डिजिटल चलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. केवळ ‘आर्थिक समावेशकता’ असा यामागील एकमेव उद्देश नसून मोबाइल क्रमांक, जन-धन आणि आधार क्रमांकाच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करून भारताने आर्थिक समावेशनाचा मोठा टप्पा गाठला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सध्या जगातील सर्वच शासनसंस्थांपुढे  आभासी चलनाचे जटिल आव्हान उभे ठाकले आहे. आभासी चलनाच्या गैरवापराबद्दल त्यांनी इशारा देत, भारत अशाप्रकारच्या आभासी चलनाच्या नियमनाबाबत विचारपूर्वक निर्णय घेईल, असेही त्या म्हणाल्या.