मुंबई : प्रबळ डॉलरच्या तुलनेत रुपयाला सावरण्यासाठी परकीय चलन गंगाजळी लक्षणीय स्वरूपात खर्च होत असून, परिणामी २१ ऑक्टोबरला संपलेल्या आठवडय़ात ती ५२४.२५ अब्ज डॉलर अशी दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरली आहे. सरलेल्या आठवडय़ात त्यात ३.८५ अब्ज डॉलरची घसरण नोंदवण्यात आली असून गंगाजळी जुलै २०२० च्या नीचांकी पातळीवर रोडावली आहे.

सरलेल्या आठवडय़ात रुपया ८३ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गडगडल्याने त्याला सावरण्यासाठी हस्तक्षेप करताना, रिझव्‍‌र्ह बँकेकडून गंगाजळीतील डॉलर खुले केले गेले. मागील काही महिन्यांपासून हा क्रम सुरू असल्यामुळे परकीय चलनाच्या साठय़ात कायम घसरण सुरू आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात परकीय चलन गंगाजळीने ६४५ अब्ज डॉलर अशी उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र पडत्या रुपयासह भांडवली बाजारातून परदेशी संस्थामक गुंतवणूकदारांच्या निधीचे माघार, खनिज तेलाच्या दरातील चढ-उतार यामुळे त्यात वेगाने घसरण सुरू आहे.

    रुपया घसरला

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारच्या सत्रात १५ पैशांनी कमकुवत होत ८२.४८ पातळीवर स्थिरावला. इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत डॉलर वधारल्याने रुपयातदेखील घसरण झाली. मात्र देशांतर्गत भांडवली बाजारातील सकारात्मक वातावरण आणि परदेशी निधीचा ओघ वाढल्याने घसरण मर्यादित राहिली. परदेशी चलन विनिमय मंचावर रुपयाने ८२.३९ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभरातील सत्रात रुपयाने ८२.२९ ही उच्चांकी तर ८२.४९ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. दिवसअखेर नीचांकी पातळीजवळ स्थिरावला. गुरुवारच्या सत्रात रुपया ४८ पैशांनी सावरून ८२.३३ पातळीवर स्थिरावला होता.