मुंबई : भारतीय भांडवली बाजाराने गेल्या वर्षभरात नवनवीन ऐतिहासिक शिखर गाठत गुंतवणूकदारांना दुहेरी अंकात परतावा दिला आहे. या बहारदार कामगिरीमुळे विदेशी संस्थागत गुंतवणूक (एफपीआय) भारतीय बाजाराकडे आकर्षित झाले असून, नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत १९,७१२ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.

डिपॉझिटरी’कडून प्राप्त आकडेवारीनुसार, १ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘एफपीएआय’कडून समभागांमध्ये १४,०५१ कोटी रुपये आणि रोख्यांमध्ये ५,६६१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. एफपीआयने भांडवली बाजारात गुंतविलेल्या निधीमध्ये उत्तरोत्तर आधी होत आहे. सरलेल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत ‘एफपीएआय’कडून भांडवली बाजारात झालेल्या गुंतवणुकीचे मूल्य ६६७ अब्ज डॉलरवर म्हणजे सुमारे ५० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

‘एफपीएआय’कडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात सप्टेंबर तिमाहीत गत वर्षीच्या तुलनेत १३ टक्कय़ांची घसघशीत वाढ नोंदली गेली आहे, असे मॉर्निंगस्टार इंडिया’चा अहवाल दर्शवितो. गेल्या वर्षी याच तिमाहीअखेर त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य ५९२ अब्ज डॉलर होते. यापैकी त्यांची निव्वळ समभागांतील गुंतवणूक ३९८ अब्ज डॉलर इतकी होती. चालू वर्षांत जुलैपासून भांडवली बाजाराकडे विदेशी गुंतवणूकदारांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. भांडवली बाजार दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आकर्षक दिसत असल्याने, ‘एफपीआय’कडून गुंतवणूक वाढत आली आहे. सरलेल्या तिमाहीत लसीकरणाचा वाढलेला वेग, कंपन्यांचे सकारात्मक तिमाही निकाल, अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याने विदेशातून गुंतवणुकीला आणखीच उद्युक्त केले आहे.