राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईने पाच नवीन निर्देशांकांना सुरुवात करण्यासह, विद्यमान निफ्टी-५० निर्देशांकाच्या रचनेतही फेरबदल येत्या १ एप्रिलपासून अमलात आणत असल्याचे घोषित केले आहे.

एनएसईची उपकंपनी इंडिया इंडेक्स सव्‍‌र्हिसेस अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स लि. (आयआयएसएल)ने नव्याने अमलात येणाऱ्या पाच निर्देशांकासह एनएसईवर एकूण ११ निर्देशांकांच्या रचनेची सोमवारी घोषणा केली. नव्या निर्देशांकांचे वैशिष्टय़ असे की, कोणतीही कंपनी केवळ एकाच म्हणजे लार्ज, मिड व स्मॉल या श्रेणीत समाविष्ट असेल. निफ्टी मिडकॅप १५०, निफ्टी स्मॉलकॅप २५०, निफ्टी फुल मिडकॅप १००, निफ्टी स्मॉलकॅप ५० आणि निफ्टी फुल स्मॉलकॅप १०० असे पाच नवीन निर्देशांक एप्रिलपासून कार्यान्वित होतील. तर विद्यमान सहा निर्देशांक- निफ्टी ५००, निफ्टी १००, निफ्टी ५०, निफ्टी नेक्स्ट ५०, निफ्टी मिडकॅप ५० आणि निफ्टी २०० जमेस धरल्यास एकूण ११ निर्देशांक असतील.

उल्लेखनीय म्हणजे नव्याने दाखल होणाऱ्या निफ्टी स्मॉलकॅप ५० निर्देशांकामुळे आता प्रत्येक श्रेणीत ५० समभागांचा निर्देशांक अस्तित्वात येईल.

टाटा मोटर्स (डीव्हीआर) ‘निफ्टी’त ५१वा

येत्या एप्रिलपासून निफ्टी ५० निर्देशांकाच्या रचनेतील नवीन बदलानुसार केर्न इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि वेदान्ता हे विद्यमान निर्देशांकात सामील समभाग गळणार असून, त्यांची जागा ऑरबिंदो फार्मा, भारती इन्फ्राटेल, आयशर मोटर्स आणि टाटा मोटर्स लि. (डीव्हीआर) हे घेतील. वस्तुत: निफ्टी ५० निर्देशांकात टाटा मोटर्स लि.चा समभाग समाविष्ट असून, टाटा मोटर्सचा (विशेष मताधिकार- डिफरन्शियल व्होटिंग राइट्स) असलेल्या समभागाच्या समावेशाने या निर्देशांकात सामील कंपन्या जरी ५० असल्या तरी समभागांची संख्या ५१ होणार आहे. निर्देशांकात समावेशाची घोषणा झालेल्या, टाटा मोटर्स (डीव्हीआर) ७.२६ टक्के, ऑरबिंदो फार्मा २.९ टक्के, भारती इन्फ्राटेल २.७ टक्के आणि आयशर मोटर्स १.४६ टक्के अशा समभागांना बाजारात मागणी वाढून भाव वधारल्याचे मंगळवारी आढळून आले. त्या उलट गळती झालेले समभागांचे भाव कोसळले. पंजाब नॅशनल बँकेचा भाव ३.२४ टक्क्यांनी गडगडला.