डीसीएक्स सिस्टीम, ग्लोबल हेल्थ, बिकाजी फूड्स व फ्यूजन मायक्रो फायनान्स गुंतवणूकदारांना आजमावणार

मुंबई : चालू वर्षांतील प्राथमिक बाजारातील सुस्ततेनंतर, येत्या आठवडय़ात चार कंपन्या बाजारातून ‘प्रारंभिक समभाग विक्री – आयपीओ’च्या माध्यमातून ४,५०० कोटींचा निधी उभारणार आहेत. बेंगळूरुस्थित डीसीएस सिस्टीम, मेदान्ता रुग्णालयाची मालकी असलेली ग्लोबल हेल्थ लिमिटेड, बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड आणि फ्यूजन मायक्रो फायनान्स या कंपन्या ‘आयपीओ’च्या माध्यमातून येत्या आठवडय़ात गुंतवणूकदारांची पसंती अजमावणार आहेत.

गेल्या वर्षी विक्रमी निधी उभारणीनंतर, विद्यमान २०२२ मध्ये प्राथमिक बाजाराला गुंतवणूकदार आणि कंपन्यांकडूनही कमी प्रतिसाद मिळाला. पहिल्या तीन महिन्यांमध्ये केवळ तीन कंपन्यांनी बाजारात प्रारंभिक समभाग विक्री केली आणि मार्चपासून १९ कंपन्यांनी हिस्सा विक्रीतून निधी उभारला आहे. २०२२ मध्ये आतापर्यंत, आयपीओच्या माध्यमातून कंपन्यांनी ४४,०८५ कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. तर वर्ष २०२१ मध्ये ६३ कंपन्यांनी भांडवली बाजारातून विक्रमी १.१९ लाख कोटींची निधी उभारणी केली होती.

  •   डीसीएक्स सिस्टीम

विद्युत तारांची निर्माता कंपनी डीसीएक्स सिस्टीम लिमिटेडने प्रत्येकी १९७ रुपये ते २०७ रुपये किमतीला येत्या ३१ ऑक्टोबरपासून प्रारंभिक खुल्या भागविक्रीची घोषणा केली आहे. २ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणाऱ्या या भागविक्रीतून ५०० कोटी रुपयांचे भांडवल उभारले जाणे कंपनीला अपेक्षित आहे. कंपनी त्यांच्या भांडवली हिश्शाच्या आंशिक विक्रीच्या माध्यमातून ४०० कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत. विद्यमान भागधारकांपैकी आणि कंपनीचे प्रवर्तक एनसीबीजी होल्डिंग्ज आणि व्हीएनसी टेक्नॉलॉजी १०० कोटी मूल्याचे समभागांची विक्री करणार आहे. गुंतवणूकदारांना किमान ७२ समभाग आणि त्यानंतरच्या ७२ च्या पटीत समभागांसाठी बोली लावता येईल. कंपनीचे समभाग ११ नोव्हेंबरला भांडवली बाजारात सूचिबद्ध होतील. 

  •   फ्यूजन मायक्रो फायनान्स

सूक्ष्म वित्त क्षेत्रातील फ्यूजन मायक्रो फायनान्सची समभाग विक्री २ नोव्हेंबरपासून खुली होत असून गुंतवणूकदारांना ४ नोव्हेंबपर्यंत अर्ज करता येईल. कंपनीने विक्रीसाठी प्रति समभाग ३५० रुपये ते ३६८ रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. या भागविक्रीतून १,१०४ कोटी रुपयांचे भांडवल उभारले जाणे कंपनीला अपेक्षित आहे. या माध्यमातून ६०० कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करण्यात येणार आहे. तर कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक त्यांचा भांडवली हिश्शाच्या आंशिक विक्रीच्या माध्यमातून ५०४ कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्रीसाठी उपलब्ध करत आहेत. वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान ४० समभाग आणि त्यानंतरच्या ४०च्या पटीत समभागांसाठी बोली लावून, कंपनीच्या या भागविक्रीत सहभागी होता येईल. फ्यूजन मायक्रो फायनान्स समाजातील आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा वंचित घटकातील महिला उद्योजकांना आर्थिक सेवा प्रदान करण्यात गुंतलेली आहे.

  •   बिकाजी फूड्स इंटरनॅशनल

तयार खाद्यपदार्थ क्षेत्रातील अग्रणी कंपनी बिकाजी फूड्स इंटरनॅशनल प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून ९०० कोटींचा निधी उभारण्याची शक्यता आहे. विद्यमान भागधारक आणि प्रवर्तक आयपीओच्या माध्यमातून २.९३ कोटी समभागांची विक्री करतील. लवकरच कंपनीकडून किंमतपट्टा निश्चित केला जाणार आहे. कंपनीचा समभाग विक्री ३ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान खुली होण्याची शक्यता आहे.

  •   ग्लोबल हेल्थ लिमिटेड

आरोग्य सेवा पुरवणाऱ्या ग्लोबल हेल्थ लिमिटेड, जी मेदान्ता नाममुद्रेअंतर्गत रुग्णालये चालवते आणि व्यवस्थापित करते. ग्लोबल हेल्थ लिमिटेडची प्रारंभिक समभाग विक्री येत्या ३ नोव्हेंबरपासून खुली होणार आहे. त्यासाठी ३१९ रुपये ते ३३६ रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनी ५०० कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करणार असून विद्यमान भागधारकांकडील ५.०८ कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येतील. गुंतवणूकदारांना किमान ४४ समभाग आणि त्यापुढे ४४च्या पटीत समभागांसाठी बोली लावता येईल.

लाख कोटींची निधी उभारणी प्रतीक्षेत

भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने ९४,००० कोटींच्या निधी उभारणीसाठी ६४ कंपन्यांच्या ‘आयपीओ’ला मान्यता दिली आहे. तर ४५ कंपन्यांनी ६५,००० कोटी रुपयांचा निधी उभारणीसाठी गेल्या वर्षी मसुदा प्रस्ताव ‘सेबी’कडे दाखल केला आहे. मात्र त्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. नवउद्यमी कंपन्या असलेल्या बोट, फार्मइझी, ड्रूम, उडान, मोबिक्वि क यांनी प्रारंभिक समभाग विक्री पुढे ढकलली आहे.