नवी दिल्ली : सेमीकंडक्टर आणि ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्समध्ये गुंतवणुकीच्या नियोजनाचा भाग म्हणून तैवानस्थित फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ यांच्या समवेत दिल्ली येथे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली.

‘फॉर्च्युन ५००’ यादीत २२ व्या क्रमांकावर असलेली ही कंपनी सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रामध्ये विस्तार करत आहे आणि आपले उत्पादन जागतिक स्तरावर उपलब्ध करण्यासाठी दक्षिण आशियातील बाजारपेठेच्या शोधात आहे. यासाठी फॉक्सकॉन समूहाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याही भेटी घेतल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या या भेटीतून ‘फॉक्सकॉन’द्वारे प्रकल्प गुंतवणुकीतून मोठय़ा रोजगार निर्मितीची आशा आहे.

राज्याच्या शिष्टमंडळात एमआयडीसीचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील, रंगा नाईक आणि महाव्यवस्थापक (पणन) अभिजित घोरपडे यांचाही समावेश होता. शिष्टमंडळाने फॉक्सकॉनच्या आयसीटी, इलेक्ट्रिक व्हेईकल्स, मोबिलिटी आणि बॅटरी उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. विप्रो, हनिवेल, मित्सुबिशी, कॉसिस ई-मोबिलिटी, टाटा मोटर्स आणि एक्साईड यासारख्या मोठय़ा उद्योगांनी राज्यात आधीच गुंतवणूक केली आहे. या आलेल्या गुंतवणुकीबाबतचा अनुभव शिष्टमंडळाने सांगितला तसेच स्थानिकीकरण व सोर्सिगच्या पर्यायांवर चर्चा केली.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले की,  फॉक्सकॉनला राज्य सरकारकडून संपूर्ण संस्थात्मक सहाय्य दिले जाईल आणि एका हाय-टेक परंतु सामाजिकदृष्टय़ा जागरूक परिसंस्थेचाचा विकास सुनिश्चित केला जाईल. यातून मोठय़ा प्रमाणात कुशल रोजगार निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धोरणात्मक गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केल्याने गेल्या दोन वर्षांत ४ लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यात यश आले आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. फॉक्सकॉनचे अध्यक्ष लिऊ यांनीही महाराष्ट्रासोबत मोठय़ा प्रमाणात समन्वय साधून जागतिक दर्जाची प्रतिभा आणि भविष्यासाठी सज्ज असलेली उत्पादने एकत्रितपणे विकसित करण्याचा मानस व्यक्त केला.