मुंबई : जागतिक पातळीवर प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून महागाई नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना यश येत आहे. अमेरिकेसह देशांतर्गत आघाडीवर महागाई कमी झाल्याने परदेशी संस्थात्मक गुंतणूकदार (एफआयआय) पुन्हा सक्रिय झाले आहेत. परिणामी परदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवडय़ांत २२,४५२ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२१ पासून चालू वर्षांत जून २०२२ पर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी देशांतर्गत भांडवली बाजारातून २.४६ लाख कोटी रुपयांचा निधी काढून घेतला होता. इतक्या कमी कालावधीत प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणावर समभाग विक्री झाली. तर सरलेल्या मे महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी ४४,००० कोटी मूल्याचे समभाग विकले आहेत. मात्र सलग नऊ महिन्यांच्या मोठय़ा कालावधीनंतर जुलै महिन्यापासून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार देशांतर्गत भांडवली बाजारात पुन्हा सक्रिय झाले आहेत.

परदेशी गुंतवणूकदारांनी सरलेल्या जुलै महिन्यात ६७१९.५५ कोटी रुपये मूल्याची समभाग खरेदी केली. तर चालू महिन्यात १२ ऑगस्टपर्यंत त्यांनी सुमारे २२,४५२ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात त्यांच्या एकूण समभाग विक्रीच्या मूल्यापेक्षा खरेदी केलेल्या समभागांचे मूल्य अधिक राहिले आहे, यावरून परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा देशांतर्गत बाजाराकडे मोर्चा वळविला असल्याचे दिसत आहे.

अमेरिकेतील महागाई दरातील नरमाईने देशांतर्गत भांडवली बाजारात परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदार पुन्हा सक्रिय झाल्याने गुंतवणूकदारांनी कमी किमतीला उपलब्ध असलेल्या बँकिंग, वित्त आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा सपाटा लावल्याने निर्देशांकांना बळ मिळाले आहे.

सरलेल्या जुलै महिन्यात अमेरिकेत महागाई दर ४० वर्षांच्या उच्चांकी पातळीपासून खाली येत ८.५ टक्क्यांवर आला आहे. अमेरिकेत इंधनाच्या किमती कमी झाल्याने महागाई दर अपेक्षेपेक्षा अधिक नरमल्याने त्याचे सकारात्मक पडसाद अमेरिकेसह जगभरातील भांडवली बाजारावर उमटले. अनियंत्रित महागाईला लगाम लावण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून आक्रमकपणे व्याज दरवाढीचे धोरण अवलंबिले जात आहे. मात्र अमेरिकेत महागाई दर कमी झाल्याने  फेडरल रिझव्‍‌र्हकडून आगामी काळात व्याज दरासंबंधाने कमी आक्रमकता दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आशियासह युरोपातील बाजारांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. देशांतर्गत पातळीवर अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने जुलै महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावरील आधारित किरकोळ महागाई दराचा पाराही उतरला. आधीच्या मे आणि जूनमध्ये सात टक्क्यांपुढे कडाडलेला हा दर, सरलेल्या महिन्यांत ६.७१ टक्क्यांपर्यंत खाली आला.

अमेरिकी चलनासमोर गेल्या काही दिवसांपासून नांगी टाकणारा भारतीय रुपया चालू महिन्यात किंचित सावरला आहे. डॉलरचा निर्देशांक जुलैअखेरीस असलेल्या १०९ अंशांवरून १२ ऑगस्टला सुमारे १०५.२६ अंशांपर्यंत घसरला आहे. डॉलर निर्देशांकातील अवमूल्यन हे उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये वाढलेल्या भांडवली प्रवाहाचे निदर्शक असते. 

व्ही.के.विजयकुमार, मुख्य रणनीतीकर, जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fpis invest rs 22 000 cr in indian markets zws
First published on: 16-08-2022 at 02:14 IST