मुंबई : क्रिप्टोकरन्सी अर्थात कूटचलनाचे वर्णन ‘सुस्पष्ट धोका’ असे करीत, कोणतीही अंतर्निहित मालमत्ता नसताना, केवळ विश्वासाच्या आधारे होणाऱ्या व्यवहारांवर मूल्य मिळविणारी ही गोष्ट म्हणजे सट्टेबाजीलाच दिले गेलेले शिष्ट, सुसभ्य रूप आहे, अशी टीकात्मक टिप्पणी करीत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी पुन्हा एकदा चिंतायुक्त सावधगिरीचा इशारा दिला. 

आभासी अर्थात कूटचलनाकडे रिझव्‍‌र्ह बँक ही सट्टेबाज मालमत्ता म्हणूनच पाहत असल्याचे अधोरेखित करीत, गव्हर्नर दास यांनी विविध सहभागी संस्थांकडून माहिती गोळा केल्यानंतर कूटचलनावरील चर्चात्मक टिपणाला अंतिम रूप देण्याच्या प्रक्रियेत सरकार आहे, असेही नमूद केले. मध्यवर्ती बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आर्थिक स्थिरता अहवालाच्या २५ व्या आवृत्तीच्या प्रास्ताविक लेखात, वित्तीय प्रणाली जसजशी डिजिटल बनत चालली आहे, तसतशी सायबर धोकेही वाढत चालले आहेत आणि त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे दास यांनी लेखात म्हटले आहे.

जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, कोणतीही अंतनिर्हित मालमत्ता नसलेल्या कूटचलनाच्या मूल्यात मोठी उलथापालथ होऊन तीव्र स्वरूपाची घसरण झाली आहे. ही मोठय़ा प्रमाणात अस्थिरता दिसत असताना दास यांचा हा इशारा आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने सर्वप्रथम २०१८ मध्ये कूटचलनासंबंधी एक परिपत्रक काढले होते आणि त्यांनी नियमन केलेल्या संस्थांना अशा साधनांमध्ये व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित केले होते. तथापि, २०२० च्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात दिलेल्या आदेशाद्वारे रिझव्‍‌र्ह बँकेचे हे परिपत्रक रद्दबातल केले. एकंदरीत नियामक स्पष्टता अद्याप नसताना, केंद्र सरकारने जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह विविध भागधारक आणि सहभागी संस्थांच्या अभिप्रायासह कूटचलनावरील चर्चात्मक टिपणाला अंतिम रूप देण्याचे काम करत आहे.