मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या प्रारंभिक समभाग विक्रीमध्ये गुरुवारी दुसऱ्या दिवशी १०३ टक्के भरणा पूर्ण झाला आहे. सोमवार ९ मेपर्यंत सुरू राहणाऱ्या या ‘आयपीओ’च्या माधमातून केंद्र सरकारने २२.१३ कोटी समभाग विक्रीसाठी खुले केले असून, त्यातून २१,००० कोटींचा निधी ते उभारू पाहत आहे.

मुंबई शेअर बाजाराकडून संध्याकाळी सात वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पॉलिसीधारकांसाठी राखीव वर्गवारीला सर्वाधिक प्रतिसाद कायम असून, त्यात विक्रीला उपलब्ध २.२१ कोटी समभागांच्या तुलनेत ३.११ पट अधिक म्हणजे ६.८९ कोटी समभागांसाठी मागणी नोंदवण्यात आली आहे. एलआयसीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव वर्गवारीत २.२२ पट अधिक समभागांसाठी अर्ज भरणा झाला आहे. मात्र गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला हिश्शाच्या भरणा अद्याप पूर्णपणे झालेला नाही. या वर्गवारींमध्ये अनुक्रमे ४७ टक्के, ४० टक्के आणि ९३ टक्के भरणा झाला आहे. या भागविक्रीसाठी प्रतिसमभाग ९०२ रुपये ते ९४९ रुपये किंमतपट्टा निश्चित केला गेला आहे. अधिकाधिक किरकोळ गुंतवणूकदारांना सामावून घेण्याच्या उद्देशाने शनिवार आणि रविवारी देखील या ‘आयपीओ’साठी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.