चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या ११ महिन्यांत म्युच्युअल फंडांच्या इक्विटी अर्थात समभागसंलग्न योजनांतील एकूण  गुंतवणूक  ६१ हजार कोटी रुपयांच्या वर गेली आहे. उंचावणाऱ्या बाजार निर्देशांकांच्या जोरावर आकर्षक परताव्यापोटी सरलेल्या फेब्रुवारीमध्ये या योजनांनी ५,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक ओघ अनुभवला आहे.
देशातील ४५ फंड घराण्यांची संघटना असलेल्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ने (अ‍ॅम्फी) दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये सलग ११ व्या महिन्यात म्युच्युअल फंडांची समभागांशी संबंधित योजनांमध्ये वाढती गुंतवणूक अनुभवली आहे.
मागील आर्थिक वर्षांतील शेवटच्या दोन्ही महिन्यांत ती नकारात्मक स्थितीत होती. तर नजीकच्या काळात नव्याने दाखल इक्विटी योजनांचा सुकाळ पाहता,  विद्यमान मार्च या १२ व्या महिन्यात म्हणजे संपूर्ण वर्षभर गुंतवणूक ओघ सकरात्मक राहणे अपेक्षित आहे.
विद्यमान २०१४-१५ सालाची सुरुवात करताना पहिल्या महिन्यात, एप्रिलमधील फंडांची समभाग योजनांमधील गुंतवणूक अवघी २०८ कोटी रुपये होती. ती जुलैमध्ये सर्वाधिक, १०,८१५ कोटी रुपयांपर्यंत गेली. गेल्या तीन महिन्यांपासून सकारात्मक असली तरी आधीच्या महिन्याच्या तुलनेत मात्र घसरत आली आहे.
समभाग निगडित योजनेतील एकूण मालमत्ता वर्षभरापूर्वीच्या १.५७ लाख कोटी रुपयांवरून यंदाच्या फेब्रुवारीअखेर ३.०७ लाख कोटी रुपये झाली आहे.
२०१४-१५ च्या पहिल्या ११ महिन्यात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३१ टक्क्यांनी उंचावला आहे. मे २०१४ मध्ये मुंबई निर्देशांक अर्थात सेन्सेक्सने विक्रमी उच्चांकाच्या दिशेने घोडदौड सुरू केली आणि त्यानंतर निरंतर नवनवीन शिखर तो गाठत आला आहे. फेब्रुवारीमध्येच म्युच्युअल फंडांची एकूण मालमत्ता व्यवस्थापन इतिहासात प्रथमच १२ लाख कोटी रुपयांपल्याड नोंदली गेली आहे.