जानेवारीपासून उपव्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. हे या संस्थेतील व्यवस्थापकीय संचालकानंतरचे दुसरे सर्वोच्च अधिकाराचे पद आहे. पुढील वर्षी ‘आयएमएफ’चे उपव्यवस्थापकीय संचालक जेफ्री ओकामोटो हे पायउतार होतील व त्या  जागी गोपीनाथ या २१ जानेवारीपासून या पदाची सूत्रे स्वीकारतील. ‘आयएमएफ’मधील कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा हार्वर्ड विद्यापीठात अध्यापन कार्यात परतण्याचा गोपीनाथ यांनी निर्णय घेतला होता.  जानेवारी २०१९ मध्ये तीन वर्षे मुदतीसाठी मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून ‘आयएमएफ’च्या सेवेत दाखल झाल्या होत्या. जेफ्री आणि गीता दोघेही उत्तम सहकारी आहेत. जेफ्रीला जाताना पाहून मला वाईट वाटते आहे, पण त्याच वेळी, गीताने उपव्यवस्थापकीय संचालकपदाची नवीन जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे, असे आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएव्हा यांनी या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया दिली.