करोनावर प्रभावी ठरणारं फेविपिरावीर औषध तयार करणाऱ्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीच्या शेअर्सचा भाव २४ टक्क्यांनी वधारला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसईमध्ये ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सच्या शेअर्सला अप्पर सर्किट लागल्याचे सोमवारी पहायला मिळाले. या कंपनीच्या प्रत्येक शेअर्सचा भाव ४९०.९० रुपयांपर्यंत वधारल्याचे पहायला मिळालं.

करोनावर प्रभावी ठरणारं फेविपिरावीर औषध तयार केलं अशून या औषधाला सरकारमार्फत मंजुरीही मिळाली असल्याची घोषणा कंपनीने शनिवारी केली होती. करोनाची सौम्य लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांना दिलं जाणारं हे औषध ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने फेविपिरावीर फेबीफ्लू ब्रांडच्या नावाने बाजारात आणलं आहे. ग्लेनमार्कच्या या औषधाला सीडीएससीओने फेविपिरावीर फेबीफ्लू च्या उत्पादन आणि वितरणाला मंजुरी दिली आहे. शनिवारी ही घोषणा केल्यानंतर सोमवारी शेअर बाजारामध्ये याचे पडसाद दिसून आले. लाइव्हमिंटने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मागील तीन महिन्यांमध्ये ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सच्या शेअर्सच्या दरामध्ये १४७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे पहायला मिळालं आहे. कंपनीच्या शेअर्स विक्रीमध्ये ५.९८ पट वाढ झाल्याचे पहायला मिळालं आहे. सोमवारी कंपनीच्या तब्बल ११ लाख ३० हजार २५३ शेअर्सच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत. गेल्या पाच दिवसांमध्ये प्रति दिन सरासरी एक लाख ७५ हजार ५४९ शेअर्सची खरेदी विक्री होत होती. त्या तुलनेत आज झालेली वाढ ही तब्बल ५४३.८४ टक्के इतकी आहे.

भारतीय औषध महानियंत्रक संस्थेकडून म्हणजेच डीसीजीआयकडून  ग्लेनमार्कच्या औषध उत्पादन आणि वितरणाला संमती देण्यात आली असल्याचे मुंबईमध्ये मुख्यालय असणाऱ्या कंपनीने शनिवारी स्पष्ट केलं. करोनासंदर्भातील उपचारांसाठी अशाप्रकारे डीसीजीआयकडू मंजुरी मिळणारं हे पहिलच औषध ठरलं आहे. फेविपिरावीरवर इतर देशांमध्ये अद्याप चाचण्या सुरु आहेत. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीमध्ये ग्लेनमार्कला फेविपिरावीरच्या वितरणाची परवानगी देण्यात आली असून ही गोळी फॅबीफ्लू नावाने विकणार असल्याचे म्हटलं होतं.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपलब्ध होणार औषध

औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपलब्ध होणार असल्याचे या कंपनीने सांगितले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे औषधाच्या एका गोळीची किंमत १०३ रुपये आहे. या औषधाचे पहिल्या दिवशी १८०० मिलिग्रॅमचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. तर १४ दिवसांपर्यंत ८०० मिलिग्रॅमचे दोन डोस रोज देण्यात येणार आहेत.