अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात भारताला जागतिक गुंतवणूकदारांची पसंती

हरित ऊर्जेच्या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा पसंतीचा देश म्हणून भारताने स्थान मिळविले आहे.

‘आरईसीएआय’ निर्देशांकात तिसऱ्या स्थानावर झेप

मुंबई : जागतिक हवामान बदल आणि वाढत असलेल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने अक्षय्य ऊर्जानिर्मितीला प्राधान्य दिले असून, या क्षेत्रात खासगी उद्योजकांचा पुढाकारही मोठा आहे. तर हरित ऊर्जेच्या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा पसंतीचा देश म्हणून भारताने स्थान मिळविले आहे.

जागतिक सल्लागार संस्था ‘ईवाय’द्वारे ‘रिन्यूएबल एनर्जी कण्ट्री अट्रॅक्टिव्हनेस इंडेक्स’ (आरईसीएआय) निकषांवर करण्यात क्रमवारीच्या ५८व्या आवृत्तीत जागतिक तुलनेत भारत अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. अक्षय्य ऊर्जा गुंतवणुकीच्या आणि उपयोजन संधींच्या आकर्षणावर आधारित जगातील आघाडीच्या ४० देशांना यामध्ये स्थान देण्यात येते. यामध्ये अमेरिका आणि चीन अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

भारतातील अक्षय्य ऊर्जा बाजाराची स्थिती, सर्वसमावेशक धोरणात्मक निर्णय, गुंतवणूक आणि आत्मनिर्भर भारतसारख्या योजनांमुळे स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात देशाला एका उंचीवर घेऊन जाईल, असे ‘ईवाय’ने अहवालात म्हटले आहे. भारताने २०२२ पर्यंत १७५ गिगावॉट अक्षय्य ऊर्जा क्षमता प्राप्त  करण्याचे उद्दिष्ट आखले आहे. २०३० पर्यंत या उद्दिष्टाची व्याप्ती ४३० गिगावॉटपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विद्युत शक्तीवरील वाहनांचा वापर वाढावा, ऊर्जा साठवण मोठय़ा प्रमाणात व्हावी, उत्तम ग्रिड्स तयार व्हावेत आणि इतर आधुनिक ऊर्जा तंत्रज्ञान विकसित व्हावे इत्यादींसाठी धोरणात्मक पावले उचलली जात आहेत.

गेल्या सहा वर्षांत, भारताची अक्षय्य ऊर्जानिर्मिती क्षमता अडीच टक्क्यांनी वाढली आहे. देशाच्या एकूण ऊर्जा क्षमतेपैकी बिगर-जीवाश्म ऊर्जा क्षमता १३६ गिगावॉट म्हणजेच ३६ टक्के इतकी झाली आहे. २०२२ पर्यंत हे प्रमाण २२० गिगावॉटपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. 

सहा वर्षांत ४.७ लाख कोटींची गुंतवणूक

गेल्या सहा वर्षांत अक्षय्य ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रात ४.७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. अलीकडे टाटा मोटर्सच्या विद्युत वाहनांच्या व्यवसायातील ‘टीपीजी’ची गुंतवणूक त्याचप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीज व अदानी समूहाच्या या क्षेत्रातील वाढत्या हालचाली याचेच द्योतक आहेत. देशाच्या या क्षेत्रातील योजनांनुसार, २०३० पर्यंत दरवर्षी एक लाख कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणूक संधी उपलब्ध होऊ  शकतात. अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारताची धोरणे अत्यंत उदार आणि लवचीक आहेत. यात परदेशी कंपन्या एकेकटय़ा वा भारतीय भागीदारांसह संयुक्तपणेही गुंतवणूक करू शकतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Global investors attract india for investment in renewable energy zws

Next Story
ओंकार स्पेशिअ‍ॅलिटीचा चिपळूणमध्ये नवा प्रकल्प
ताज्या बातम्या