scorecardresearch

जागतिक पडझडीने ‘सेन्सेक्स’ला ८६६ अंश गळती

जागतिक पातळीवरील प्रतिकूल प्रवाहांचे देशांतर्गत भांडवली बाजारात पडसाद म्हणून गुंतवणूकदारांनी शुक्रवारी विक्रीचा मारा केल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये ८६६ अंशांची घसरण झाली.

मुंबई : जागतिक पातळीवरील प्रतिकूल प्रवाहांचे देशांतर्गत भांडवली बाजारात पडसाद म्हणून गुंतवणूकदारांनी शुक्रवारी विक्रीचा मारा केल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये ८६६ अंशांची घसरण झाली. परिणामी, सप्ताहाअखेरच्या व्यवहारात निर्देशांकाने ५५,००० अशांची पातळीही सोडली.

शुक्रवारी सुरुवातीपासून नकारात्मक कल राहिलेल्या सत्रात सेन्सेक्समध्ये १,११५.४८ अंशांची घसरण होत ५४,५८६.७५ अंशांच्या नीचांकी पातळीपर्यंत रोडावला होता. मात्र सत्रअखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८६६.६५ अंशांची घसरण होत तो ५४,८३५.५८ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  २७१.४० अंशांची घसरण झाली आणि तो १६,४११.२५ पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्स, अ‍ॅक्सिस बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, नेस्ले, विप्रो, एचडीएफसी, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर दुसरीकडे टेक मिहद्र, पॉवर ग्रीड, आयटीसी, स्टेट बँक आणि एनटीपीसीच्या समभाग तेजी होती.

बाजार घसरणीची मुख्य कारणे

  •   जागतिक बाजारातील पड : फेडरल रिझव्‍‌र्हने महागाई रोखण्यासाठी हाती घेतलेल्या आक्रमक उपाययोजनांच्या भीतीने अमेरिकी भांडवली बाजारात मोठी घसरण झाली. फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदरात अर्धा टक्क्यांची वाढ केली असून त्यात आणखी वाढीचे संकेत दिले आहेत. अमेरिकी भांडवली बाजाराच्या नॅसडॅक निर्देशांकात परिणामी गुरुवारी ५ टक्क्यांची घसरण झाली, जी २०२० नंतरची सर्वात मोठी घसरण आहे. त्याचबरोबर डाऊ जोन्स निर्देशांकात ३.१२ टक्के आणि एसअँडपी ५०० निर्देशांकात ३.५६ टक्क्यांची घसरण झाली. अमेरिकी भांडवली बाजारातील घसरणीचे पडसाद आशियाई भांडवली बाजारात उमटले.
  •   रिझव्‍‌र्ह बँकेची ‘रेपो’ दरवाढ : जागतिक पातळीवर प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या व्याजदर वाढीच्या मोहिमेमध्ये रिझव्‍‌र्ह बँकदेखील बुधवारी सामील झाली.  नियोजित वेळेआधीच तातडीच्या बैठकीद्वारे रेपो दरात ४० आधार बिंदूंची वाढ करून तिने सर्वाना चकित केले. तज्ज्ञांच्या मते, आता जूनमधील रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियोजित द्विमाही पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गुरुवारी, बँक ऑफ इंग्लंडनेदेखील व्याजदर थेट १ टक्क्यांनी वाढवत, महागाईच्या भडक्यातून जागतिक मंदीचा इशारा दिला. रशिया-युक्रेन युद्ध आणि चीनमधील टाळेबंदीमुळे मध्यवर्ती बँकांनी वर्षभरासाठी महागाईचा अंदाज १० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. 
  •   रोख्यांच्या परताव्यात वाढ : जगभरातील बाजारात घसरण झाल्याने जागतिक पातळीवर गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या गुंतवणूक साधनांचा शोध घेत आहेत. यामुळे समभागांच्या तुलनेने कमी जोखीम असणाऱ्या रोख्यांमध्ये गुंतवणूक वाढली आहे. अमेरिकेत १० वर्षे मुदतीच्या रोख्यांवरील परताव्याचा दर २०१८ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.

रुपया प्रति डॉलर ७७च्या नीचांकाकडे

मुंबई : डॉलरच्या तुलनेत सलग चार सत्रात बळकटी मिळविलेल्या रुपयाने शुक्रवारी एकाच व्यवहारात ५५ पैशांची आपटी नोंदविली. डॉलरसमोर मोठय़ा फरकाने कमकुवत होत स्थानिक चलन ७६.९० रुपयांवर स्थिरावले. शुक्रवारच्या सत्रात ७६.५६ पर्यंतच उच्चांक, तर ७६.९६ हा त्याचा व्यवहारादरम्यान तळ राहिला. गुरुवारी रुपया ७६.३५ वर बंद झाला होता. जागतिक पातळीवर खनिज तेलाचे दर ११३ डॉलर प्रतिपिंपापुढे गेले असून देशांतर्गत भांडवली बाजारातून विदेशी संस्थामक गुंतवणूकदारांकडून निधीचे निर्गमन सुरू असल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Global sensex plunges global level streams country capital market ysh