गेल्या वर्षभरात विक्रमी टप्प्याला पोहोचलेल्या मौल्यवान धातूचा दरप्रवास चालू वर्षांतही वेगवान असेल, या आशेवर गुंतवणूकदारांनी सोने संलग्न गुंतवणूक पर्याय – गोल्ड ईटीएफ म्युच्युअल फंडांमध्ये वर्षांरंभी  गुंतवणूक भरीव स्वरूपात वाढविली आहे.

जानेवारी २०२१ मध्ये गोल्ड ईटीएफमधील निधीओघ मासिक तुलनेत ४५ टक्क्यांनी झेपावत ६२५ कोटी रुपये झाला आहे.

जानेवारीच्या तुलनेत डिसेंबर २०२० मध्ये गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक कमी, ४३१ कोटी रुपये होती. तर आधीच्या महिन्यात, नोव्हेंबरमध्ये या पर्यायातून गुंतवणूकदारांनी १४१ कोटी रुपये काढून घेतले होते.

गोल्ड फंडांची मालमत्ता जानेवारी २०२१ मध्ये २२ टक्क्यांनी वाढून १४,४८१ कोटी रुपये झाली आहे. वर्ष २०२० अखेरच्या महिन्यात ती १४,१७४ कोटी रुपये होती, असे ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ने म्हटले आहे.

वर्ष २०२० मध्ये मार्च ते नोव्हेंबरदरम्यान गोल्ड ईटीएफमध्ये ६,६५७ कोटी रुपये भर पडली आहे. आधीच्या वर्षांतील याच कालावधी तुलनेत त्यात अवघी १६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२१ दरम्यान गोल्ड ईटीएफमध्ये ४८,१५८ कोटी रुपये वाढले आहेत.