मौल्यवान धातूंच्या किमतीतील घसरण आणि त्यावरील शिथिल झालेले र्निबध देशात सोने आयात पुन्हा वाढविण्यास कारणीभूत ठरले आहे. एप्रिलमध्ये सोन्याची आयात ३.१३ अब्ज डॉलर मूल्याची म्हणजे तब्बल ७८.३३ टक्क्य़ांनी वाढली आहे. वर्षभरापूर्वी सोन्याची आयात १.७५ अब्ज डॉलर होती. तर आधीच्या, मार्चमध्ये ती ९४ टक्क्य़ांनी वाढत ४.९८ अब्ज डॉलपर्यंत गेली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर तूर्त कमी व घसरत आहेत. त्या उलट भारतात किमती घसरत नसल्या तरी लग्नाचा हंगाम व मागणी असूनही सोन्याच्या किमती तुलनेने किमान पातळीवर आहेत. भांडवली बाजारात सद्य अस्थिरतेनेही गुंतवणूक म्हणून सोन्याकडील कल वाढत आहे.  तथापि नोव्हेंबर २०१४ पासून रिझव्‍‌र्ह बँकेने र्निबध कमी केल्यानंतर सोने आयातीचे प्रमाण वाढू लागले. वाढत्या सोने आयातीमुळे व्यापार तूट वाढून सरकारच्या तिजोरीवरील भार वाढण्याची चिंता कायम आहे. कच्च्या तेलानंतर सोने ही दुसरी मोठय़ा प्रमाणात आयात होणारी वस्तू आहे.

एप्रिलमध्ये एकूण निर्यातीत १४ टक्के घसरण
देशातील निर्यातीतील सातत्य कामय असून गेल्या महिन्यात ती १४ टक्क्य़ांनी रोडावली आहे. एप्रिल २०१५ मध्ये भारताची निर्यात २२ अब्ज डॉलरवर येऊन ठेपली आहे. निर्यातीने सलग पाचव्या महिन्यात घसरण नोंदविली आहे. जागतिक बाजारातील मंदी व आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे घसरते दर यामुळे निर्यातीला यंदा प्रोत्साहन मिळू शकले नाही. यापूर्वी नोव्हेंबर २०१४ मध्ये निर्यातीत ७.२७ टक्के वाढ राखली गेली होती. तर वर्षभरापूर्वी, एप्रिल २०१४ मध्ये निर्यात २५.६३ अब्ज डॉलर नोंदली गेली होती. त्याचबरोबर यंदा आयात घसरल्याचा दिलासा मिळाला आहे. एप्रिलमधील आयात ७.४८ टक्क्य़ांनी कमी होत ३३ अब्ज डॉलर झाली आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या महिन्यातील व्यापार तूट ११ अब्ज डॉलर झाली आहे.