२०१५ पासून सातत्याने दरातील घसरण नोंदविणाऱ्या सोने धातूने गेल्या नऊ महिन्यांत तब्बल २७ टक्क्यांची घट राखली आहे. सोने दराने ऑगस्ट २०१३ मध्ये ३३,७९० हा सार्वत्रिक उच्चांक नोंदविला आहे, तर आता ते २४,८०० नजीक येऊन ठेपले आहे. भांडवली बाजाराने बुधवारी निर्देशांक वाढीसह अनोख्या टप्प्याचा प्रवास केला असतानाच मौल्यवान धातूने बुधवारी घसरणीसह त्याचा उल्लेखनीय स्तर सोडला. घसरत्या सोने दराबाबत चिंता व्यक्त करतानाच सरकारच्या हस्तक्षेपाची अपेक्षा इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी केली आहे. घसरत्या सोने दरांमुळे सराफांचे वाढते नुकसान टाळण्यासाठी तसेच रत्न व दागिने क्षेत्राचे वाढती अनुत्पादक मालमत्ता कमी करण्यासाठी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे.