भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्यापेक्षा चांदीच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होत असल्याचे पहायला मिळत आहे. सध्याच्या आठवड्यामध्ये (२१ सप्टेंबर २०२० ते २४ सप्टेंबर २०२० दरम्यान) सोन्या चांदीच्या दरांमध्ये घसरण होत असल्याचे दिसत असतानाच गुरुवारी सोन्याचे भाव पुन्हा गडगडल्याचे दिसत आहे. गुरुवारी सोन्याचे दर ०.४५ टक्क्यांनी कमी झाले. सोन्याचे दर आता ५० हजार प्रति तोळाच्या खाली आले आहेत. सध्या सोन्याचा भाव प्रति तोळा ४९ हजार २९३ रुपये इतका आहे. तर चांदीचे दर तब्बल तीन टक्क्यांनी कमी झाले असून ते ५६ हजार ७१० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या किंमतीमध्ये मागील काही दिवसांनी सातत्याने घट होताना दिसत आहे. अमेरिकन चलनाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थिती अधिक मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी पडझड झाली आहे. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारापेठेत सोन्याचे दर दोन टक्क्यांनी कमी झाले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर १८६२ डॉलर प्रति औंस (२८.३४ ग्रॅम) पर्यंत खाली आले आहेत. हाच दर २२ तारखेला १९०० डॉलर प्रति औंस इतका होता.

चार दिवसांमध्ये सोनं जवळजवळ अडीच हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. दोन दिवसांपूर्वी सोन्याची किंमत प्रति तोळा ९५० रुपयांनी खाली आली होती. तर बुधवारी चांदीचे दर साडेचार टक्क्यांनी म्हणजेच दोन हजार ७०० रुपयांनी कोसळल्याचे पहायला मिळाले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार युरोपमध्ये आर्थिक मंदीची चिन्ह दिसत असल्याने युरोपियन चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचा भाव वधारला आहे.

नक्की पाहा >> या दहा देशांकडे आहे जगातील सर्वाधिक सोनं, पहिल्या स्थानावर आहे…

सोन्या चांदीचे भाव घसरत आहे हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे हे निर्देश आहेत अस एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी दोन दिवसांपूर्वी पीटीआयशी बोलताना म्हटलं होतं. करोनाची दुसरी लाट येऊ शकते या भितीने गुंतवणुकदारांनी आता डॉलरमध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळेच अमेरिकन चलन अधिक मजबूत होताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये आणखीन घसरण होऊ शकते असंही तज्ज्ञांचं मत आहे.