नवनिर्वाचित ‘सीआयआय’ अध्यक्षांचा ८.२ टक्क्यांच्या विकासदराचा कयास

मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर वाढवण्याचा घेतलेला निर्णय आणि यंदा चांगला पाऊस होण्याचे अनुमान या गोष्टी महागाईचा भडका आटोक्यात आणण्यास मदत करतील, असा विश्वास आघाडीची उद्योग संघटना – ‘सीआयआय’चे नवनिर्वाचित अध्यक्ष संजीव बजाज यांनी सोमवारी आयोजित आभासी वार्तालाप कार्यक्रमात व्यक्त केला.

आपण आता चढय़ा व्याज दराच्या पर्वात प्रवेश केला असून, ते तापलेल्या महागाईच्या झळा कमी करण्यासाठी आवश्यक पाऊल असल्याचे बजाज यांनी सीआयआय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयोजित पहिल्याच पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतींनुसार, देशाची अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षांत ७.४ टक्के ते कमाल ८.२ टक्के दराने विकास पावेल, असा कयास त्यांनी व्यक्त केला. विविध घटकांनी यंदा चांगल्या मान्सूनची आशा व्यक्त केली आहे. तसे घडल्यास वर्षांच्या उत्तरार्धात महागाईसंबंधाने धोरणकर्त्यांना स्पष्ट आकलनासह,  कर्जावरील व्याजदर कुठपर्यंत वाढतील, याचे चित्रही सुस्पष्टपणे पुढे येईल, असे बजाज म्हणाले.  रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर वाढीचे चक्र आधीच सुरू केले आहे आणि येत्या वर्षभरात व्याजदर वाढत राहण्याचे कयास आहेत. मात्र रिझव्‍‌र्ह बँकेकडून आगामी बैठकीत, व्याजदरांसंबंधाने आगामी काळाबाबत त्यांचा नेमका दृष्टिकोन आणि ठोस संकेत मिळून स्पष्टता आणली जावी, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ‘अमृतमहोत्सवापल्याडचा भारत’ या मध्यवर्ती संकल्पनेला धरून  स्पर्धात्मकता, विकास, शाश्वतता आणि आंतरराष्ट्रीयीकरण या चतु:सूत्रीची कास धरून कार्यक्रमाच्या आयोजनाचा संकल्पही त्यांनी सोडला.