निवृत्तिवेतनाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडील ५ टक्के रक्कम भांडवली बाजारात गुंतविण्यास सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. यानुसार चालू आर्थिक वर्षअखेपर्यंत ५,००० कोटी रुपये हे बाजारातील ईटीएफमध्ये गुंतविले जाणार आहेत.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नव्या गुंतवणूक पर्यायाबाबत कामगार खात्याने शुक्रवारी परिपत्रक जारी केले. भांडवली बाजारात भविष्य निर्वाह निधीतील १५ टक्क्यांपर्यंतची रक्कम गुंतविण्याची शिफारस अर्थ खात्याने केली होती. भांडवली बाजारासारख्या अस्थिर परतावा देणाऱ्या पर्यायात कर्मचाऱ्यांकडील रक्कम गुंतविण्यास कामगार संघटनांचा विरोध होता.
२०१४-१५ मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील वाढीव जमा रक्कम ८०,००० कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षांत ही रक्कम १ लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. संघटनेकडे सध्या ६.५ कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन होते. त्यावर वार्षिक ८.७५ टक्के व्याज दिले जाते.
कामगार सचिव शंकर अगरवाल यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात भविष्य निर्वाह निधीतील काही रक्कम ही ईटीएफमध्ये गुंतविली जाईल. सरकारी ईटीएफमधील गुंतवणुकीबाबत यानंतर निर्णय घेतला जाईल. भांडवली बाजारात प्रथमच कर्मचाऱ्यांकडून जमा होणाऱ्या निधीचा या माध्यमातून शिरकाव होत आहे.