बाजारातील विक्रमी तेजीचे सरकारही लाभार्थी…

मुंबई : भारतीय भांडवली बाजाराच्या रोखे उलाढाल कराच्या (एसटीटी) माध्यमातून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत १०,००० कोटी रुपयांचा कर प्राप्त झाला आहे. अर्थचक्र करोनामुळे अडखळल्याने सरकारला अन्य स्रोतातून कर महसूल अपेक्षेपेक्षा कमी मिळत असताना, हा तुलनेने अनपेक्षितपणे मिळालेला दिलासाच आहे.

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २००४-०५च्या केंद्रीय अर्थसंकल्पात पहिल्यांदा रोखे उलाढाल कर (एसटीटी) लागू करण्याची घोषणा केली. रोख्यांतील एकूण उलाढालीच्या ०.०२५ टक्के ते ०.१ टक्के या दराने तो आकारला जातो. भांडवली बाजारातील समभागांचे रोखीतील आणि वायदे व्यवहार या कराच्या अधीन असतात. समभाग खरेदी अथवा विक्रीचा व्यवहार केल्यानंतर एकूण व्यवहार रकमेवर हा कर आकारला जातो.

चालू आर्थिक वर्षासाठी १८ सप्टेंबरपर्यंत एसटीटीद्वारे निव्वळ कर संकलन गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ७३ टक्क्यांनी वाढले आहे. कर अधिकाऱ्यांच्या मते, १ एप्रिल २०२१ ते १८ सप्टेंबर २०२१ दरम्यान एसटीटी संकलन संपूर्ण २०१९-२० आर्थिक वर्षाच्या पातळीजवळ पोहोचले आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० या कराच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत १२,३७४ कोटी रुपये आले होते. भारतीय भांडवली बाजारातील तेजी अशीच कायम राहिल्यास चालू आर्थिक वर्षात २१,००० ते २२,००० कोटी रुपयांचा रोखे उलाढाल कर मिळण्याचा विश्वास कर प्रशासनाने व्यक्त केला आहे. तेजीच्या आकर्षणामुळे वाढलेले गुंतवणूकदार व पर्यायाने वाढलेल्या उलाढालीमुळे कर संकलनातही मोठी वाढ झाली आहे.

अनेक नवगुंतवणूकदार कंपन्यांच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये (आयपीओ) सहभागी होतात आणि सूचिबद्धतेच्या दिवशी समभागाची विक्री करतात. पुन्हा नफ्यासह आलेले पैसे दुसऱ्या कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये गुंतवतात. यामुळे रोखे उलाढाल कराच्या संकलनाला चालना मिळत असल्याचे जाणकार सांगतात.

तेजीचे तुफान उपकारक!

  चालू वर्षात १ जानेवारीला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४७,८६९ पातळीवर होता. तो आता गेल्या आठवड्यात ५९ हजारांपल्याड गेला. फक्त ८ महिन्यांत सेन्सेक्सने विक्रमी १०,५०० अंशांची वाढ नोंदविली आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये याच कालावधीत ३,४५० अंशांची भर पडली आहे.

   तेजी अशीच कायम राहिल्यास चालू आर्थिक वर्षात २१,००० ते २२,००० कोटी रुपयांचा रोखे उलाढाल कर मिळण्याचा विश्वास कर प्रशासनाने व्यक्त केला आहे.