भांडवली बाजारातील गुंतवणुकीची कुठलेच सरकार हमी देणार नाही

राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सांगितले

कामगार मंत्र्यांचा पीएफ गुंतवणुकीवर खुलासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत भांडवली बाजारात होणाऱ्या गुंतवणुकीबाबत हमी देण्याचे सरकारने बुधवारी टाळले. दरम्यान, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील वार्षिक व्याजदर बदलाबाबत बुधवारी कोणताही निर्णय झाला नाही.
राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सांगितले की, निधी संघटनेची बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील घडामोडींवर अवलंबून असून तिची पूर्ण हमी सरकार देऊ शकत नाही.
भांडवली बाजारातील जोखीम पाहता काही कामगार संघटनांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय राखून ठेवण्याची इच्छा प्रदर्शित केल्याचेही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. बाजारातील गुंतवणुकीबाबत संघटनेचे नेते, प्रतिनिधींनी चिंता तसेच सावधानताही व्यक्त केल्याचे ते म्हणाले.
कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या संघटनेमार्फत ६ ऑगस्टपासून बाजारातील ईटीएफ प्रकारात गुंतवणूक केली जात आहे. ही गुंतवणूक विस्तारताना संघटनेकडे असलेल्या एकूण रकमेपैकी ५ टक्क्य़ांपर्यंत नेण्याचा सरकारचा मानस आहे.
ऑगस्टमध्ये सुरू झालेली ईटीएफमधील गुंतवणूक ३० नोव्हेंबपर्यंत ३,१७४ कोटी रुपयांची झाल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी मंगळवारीच संसदेत सांगितले होते.
संघटनेकडे चालू आर्थिक वर्षांत जमा होणाऱ्या अतिरिक्त १.२० लाख कोटी रुपयांमुळे ईटीएफमध्ये ६,००० कोटी रुपये गुंतवणूक होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Govt cant suggest to invest in capital market bandaru