देशात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी करण्यात आलेल्या घोषणा अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सोमवारी संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य ठरले. रोजगार निर्मितीच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास, कौशल्य विकास, ग्रामीण अर्थव्यवस्था या विभागांवर सरकारकडून लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या मते, औषध, आरोग्यसेवा, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण या क्षेत्रातील रोजगाराला चालना देण्यासाठीच्या उपाययोजनांवर सरकारचा मुख्य भर आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच आरोग्य क्षेत्रातील तरतूदी, कौशल्य विकास, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि देशातंर्गत मागणी वाढविण्यासाठीच्या अर्थसंकल्पातील उपाययोजना रोजगार निर्मितीवर प्रभाव टाकणाऱ्या असल्याचे मत कामगार भरती करणाऱ्या अंताल इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक जोसेफ देवासिया यांनी सांगितले.