जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांची घोषणा
राज्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी वापरात आणावे; वाढत्या नागरीकरणातून निर्माण झालेल्या कचऱ्याच्या समस्यांवर घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पांना प्राधान्य मिळणे ही महाराष्ट्राची मोठी गरज असून, अशा प्रकल्पांसाठी गुंतवणुकीत स्वारस्य असलेले अनेक प्रकल्प राज्य सरकारच्या विचाराधीनही आहेत व त्यांना अग्रक्रमाने विचारात घेतले जाईल, असे प्रतिपादन जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी येथे केले.
गोरेगाव (पूर्व) येथील मुंबई प्रदर्शन संकुलात ‘आयफॅट इंडिया’ या जल आणि मल पुनप्र्रक्रिया उद्योग व तंत्रज्ञानाला वाहिलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना, शिवतारे यांनी वरील ग्वाही दिली. या प्रसंगी जर्मनीचे वाणिज्यदूत मायकेल सीबर्ट, एमएमआय इंडियाचे मुख्य परिचालन अधिकारी इगोर पालका त्यांच्यासह उपस्थित होते. देशभरातील राज्य व स्थानिक स्वराज संस्थांच्या प्रशासनाने या प्रदर्शनात सामील कंपन्या आणि त्यांच्याकडून उपलब्ध तंत्रज्ञानाचा अभ्यास करून, त्याच्या स्थानिक परिस्थितीला साजेसा अवलंब कसा केला जाऊ शकेल, हे पाहिले पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रालाही सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचे दुर्भिक्ष कमी करणाऱ्या तसेच वाढत्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्येतून सुटका करणाऱ्या घनकचरा व्यवस्थापनातून वाणिज्य लाभाच्या प्रकल्पाची नितांत गरज असल्याचे शिवतारे यांनी सांगितले. परंतु हे प्रकल्प व तंत्रज्ञान हे शाश्वत धाटणीचे तसेच किफायतीही असतील याची दक्षता घेतली जाईल. विशेषत: स्मार्ट शहरांची योजना राबवीत असताना हे आवश्यकच ठरणार आहे. शिवाय सामान्य नागरिकांमध्ये या समस्यासंबंधी शिक्षण, प्रबोधन करून समस्येच्या मुळापासून निवारण करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठवाडय़ासाठी जलसंधारण आयुक्तालय
सातत्याने अवर्षण आणि तुटीच्या पावसाशी सामना करीत असलेल्या मराठवाडय़ासाठी सर्वसमावेशक जलसंधारण आयुक्तालय स्थापण्याची आपण राज्य सरकारला शिफारस केली असल्याची शिवतारे यांनी माहिती दिली. पाणी व सिंचनासाठी सध्या वेगवेगळ्या पाच विभागांतर्गत येणाऱ्या योजनांमध्ये समन्वय साधून त्या एकाच आयुक्तालयामार्फत राबविणे अधिक परिणामकारक ठरेल आणि लोकांच्या दृष्टीनेही सोयीचे ठरेल, असा यामागे विचार असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत वर्षभरात ज्या वेगाने आणि प्रभावीपणे कामे सुरू झाली हे उदाहरण देशात इतरत्र कुठे सापडणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.