प्रमुख निर्देशांकांत सलग सहाव्या सत्रात घसरण

मुंबई : रशिया-युक्रेनमध्ये युद्ध होण्याचा धोका अजूनही कायम असल्याने बुधवारी सलग सहाव्या सत्रात भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकात घसरण झाली. मंदीवाल्यांनी बाजाराचा ताबा घेतल्याने गेल्या सहा सत्रांत सेन्सेक्सने १,०७८ अंश गमावले आहेत. बुधवारच्या सत्रात बराच काळ दोन्ही प्रमुख निर्देशांक सकारात्मक पातळीवर व्यवहार करत होते. मात्र विशेषत: अखेरच्या तासात निर्देशांकात घसरण वाढत गेली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६८.६२ अंशाच्या घसरणीसह ५७,२३२.०६ पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २८.९५ अंशाची घसरण झाली. दिवसअखेर हा निर्देशांक १७,०६३.२५ पातळीवर स्थिरावला. युक्रेन सीमेजवळ रशियन सैन्याच्या हालचाली वाढल्यानंतर, पाश्चात्त्य देशांनी लादलेल्या आंशिक र्निबधांमुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन नरमाईची भूमिका घेतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

सेन्सेक्समध्ये एनटीपीसी, लार्सन अँड टुब्रो, नेस्ले आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर क्षेत्रीय पातळीवर ऊर्जा, भांडवली वस्तू आणि तेल आणि वायू निर्देशांकात ०.५४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.  जागतिक पातळीवर प्रमुख देशांच्या भांडवली बाजाराची सकारात्मक सुरुवात झाल्यामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात देखील प्रमुख निर्देशांकांनी सकारात्मक व्यवहाराला सुरुवात केली. मात्र बाजारातील अस्थिरता आणि समभाग विक्रीचा दबाव वाढल्याने बुधवारच्या सत्रात मंदीवाल्यांचा पगडा राहिला. रशिया-युक्रेनमुळे भू-राजकीय अनिश्चितता आणि वाढत्या इंधनाच्या किमतींचा परिणाम बाजारांवर कायम राहील. व्यापक बाजारपेठांचे प्रतिनिधित्व करणारे स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांकांनी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकाच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे, तर क्षेत्रीय आघाडीवर, गृहनिर्माण कंपन्यांच्या समभागांना गुंतवणूकादारांकडून अधिक मागणी राहिली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.