सरलेली डिसेंबर तिमाही फलदायी

मुंबई : देशभरात घरांच्या मागणीत आणि पर्यायाने घरांसाठी कर्जाच्या मागणीत करोना साथीमुळे अर्थचक्र थंडावले असताना उत्साहवर्धक वाढ झाली आहे. मुख्यत: पहिल्या लाटेनंतर टाळेबंदी शिथिलतेपश्चात डिसेंबर २०२० पर्यंत समाप्त तिमाहीत गृह कर्ज बाजारपेठ वार्षिक तुलनेत ९.६ टक्क््यांनी विस्तारल्याचे उपलब्ध आकडेवारी सांगते.

देशातील बँका, गृहवित्त संस्था आणि बँकेतर वित्तीय संस्थांकडून वितरित गृह कर्जाचे एकूण प्रमाण हे डिसेंबर २०२० अखेर २२.२६ लाख कोटी रुपयांवर गेले आहे, आधीच्या वर्षात डिसेंबर २०१९ अखेर त्याचे प्रमाण २०.३१ लाख कोटी रुपये होते, असे पतगुणांकन संस्था ‘क्रिफ हाय मार्क’ने जाहीर केलेला अहवाल सांगतो. या अहवालानुसार, नव्याने वितरित आणि आधीपासून सुरू असलेले कर्ज जमेस धरल्यास, गृह वित्त बाजारपेठेची वर्षागणिक वाढ ही १०.४ टक्के इतकी आहे.

करोनाच्या पहिली लाट आणि देशव्यापी टाळेबंदीने प्रभावित आधीच्या तीन तिमाहींमध्ये घरांसाठी कर्जासाठी मागणीतील वाढ नगण्य अथवा नकारात्मक राहिल्याचे अहवाल दर्शवितो. देशाच्या बहुतांश भागात अनेक व्यवसाय ठप्प आणि कर्ज वितरणही थंडावले असल्याचा हा परिणाम होता.

गेल्या तीन वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा गृह वित्त बाजारपेठेवर ४५ टक्के हिस्सेदारीसह वरचष्मा राहिला आहे. डिसेंबर २०२० अखेर तिमाहीत दिसलेल्या वाढीतही घरांसाठी वितरित एकूण कर्जात सार्वजनिक क्षेत्रातील पहिल्या पाच बँकांचा ३० टक्के हिस्सा राहिला असल्याचे अहवालात म्हटले आहे.

गृह कर्जाच्या परतफेडीत हयगयीचे प्रमाणही वाढले असल्याचे हा अहवाल सांगतो. कर्जदारांच्या वयोगटानुरूप, वय वर्षे ४५ पेक्षा अधिक वयोगटातील कर्जदारांमध्ये कर्जफेडीत कसूर केल्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. त्या खालोखाल २६ ते ४५ या वयोगटाचा क्रमांक येतो. मात्र २६ वर्षांपेक्षा खालील कर्जदारांमध्ये हप्त्यांचा भरणा अनियमित आणि कर्जफेडीत कसूर झाल्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे अहवाल दर्शवितो.