वृत्तसंस्था, नवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या पायाभूत आठ क्षेत्रांची वाढ मार्चमध्ये ४.३ टक्क्यांवर खुंटली आहे. आधीच्या फेब्रुवारी महिन्यात त्यांचा वाढीचा वेग ६ टक्के राहिला होता, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली. कोळसा आणि खनिज तेल उत्पादनातील घसरणीमुळे मार्चमधील वाढीला मर्यादा पडल्या. 

ताज्या आकडेवारीनुसार, आठ प्रमुख क्षेत्रांपैकी फक्त तीन क्षेत्रांनी मार्चमध्ये उत्पादन वाढीत वेग कायम राखला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात सहा क्षेत्रांमध्ये चांगली वाढ दिसून आली होती. सरलेल्या मार्चमध्ये खते, सिमेंट आणि वीज या क्षेत्रांत वाढ दिसून आली. खतांमध्ये वार्षिक आधारावर मार्च महिन्यात १५.३ टक्के वाढ झाली. तर सिमेंट आणि वीज क्षेत्रात अनुक्रमे ८.८ टक्के आणि ४.९ टक्के वाढ झाली.

मार्चमध्ये कोळशाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत किरकोळ ०.१ टक्क्यांनी घटले. तर खनिज तेल उत्पादनांत वार्षिक आधारावर ३.४ टक्क्यांची घसरण दिसून आली. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, खते, स्टील, सिमेंट आणि ऊर्जा या क्षेत्रांचा पायाभूत आठ उत्पादन क्षेत्रांत समावेश होतो.