देशातील सेवा क्षेत्राची वाढ सरलेल्या ऑक्टोबरमध्ये ५८.४ गुणांवर नोंदली गेली. मासिक सर्वेक्षणावर आधारित या निर्देशांकाने नव्या व्यवसाय मागणीमुळे मागील ११ वर्षांतील सर्वोच्च गतिमानता नोंदविल्याचे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालाने नमूद केले. बाजारातील अनुकूल परिस्थिती आणि व्यावसायिकांमध्ये उत्साह निर्माण झाल्याच्या पाश्र्वाभूमीवर सेवा क्षेत्रात तेजी नोंदविण्यात आली.

‘आयएचएस मार्किट इंडिया’च्या सेवा उद्योगातील खरेदी व्यवस्थापकांनी नोंदविलेल्या कलावर आधारित, सेवा क्षेत्राचा ‘पीएमआय’ निर्देशांक ऑक्टोबरमध्ये ५८.४ गुणांवर पोहोचला आहे. सप्टेंबरमध्ये तो ५५.२ वर नोंदला गेला होता. ऑक्टोबरमध्ये वधारलेला ‘पीएमआय’ निर्देशांक हा जुलै २०११ नंतरचा म्हणजे जवळपास ११ वर्षांतील उच्चांक ठरला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात सेवा क्षेत्रात वाढ झाली. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५० च्या खाली गुणांक आकुंचनाचे निदर्शक मानले जाते.

महागाईवाढ चिंताजनक

कच्चा माल व उत्पादन घटकांच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्याने कंपन्यांनी त्यांचे सेवा शुल्क वाढविले असून ते साडेचार वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. इंधन दरवाढ, किरकोळ खर्च, कार्यालयीन साहित्य, कर्मचारी आणि वाहतूक खर्च वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. वाढत्या महागाईमुळे येत्या वर्षात वाढीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण ‘आयएचएस मार्किट इंडिया’च्या अर्थशास्त्रज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी नोंदविले.

जागतिक पातळीवर देशातील कंपन्यांच्या सेवांना मागणी घटली आहे. परिणामी ऑक्टोबर महिन्यात सेवा क्षेत्राच्या निर्यातीत घसरण झाली आहे. करोनाचा उद्रेक झाल्यापासून हा कल कायम असल्याचा निष्कर्ष नोंदवला गेला आहे, असे सर्वेक्षणात नमूद केले आहे.

रोजगार मात्राही वाढली!

नवीन व्यवसायात लक्षणीय वाढ झाल्यामुळे सेवा क्षेत्रात दशकातील सर्वात जलद विस्तार झाला. परिणामी अर्थव्यवस्थेत रोजगाराच्या आघाडीवर ऑक्टोबर महिन्यात आशादायी चित्र आहे. सेवा उद्योगाच्या कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्यात अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सप्टेंबरपासून वाढ सुरू असून नवीन रोजगाराच्या संधी फेब्रुवारी २०२० च्या पातळीवर पोहोचल्या आहेत.