* सप्टेंबरमध्ये १.१७ लाख कोटींवर  *  सलग तिसऱ्या महिन्यात लाख कोटींपुढे मजल

नवी दिल्ली : सरलेल्या सप्टेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाने सलग तिसऱ्या महिन्यात एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. या करापोटी गोळा झालेले १.१७ लाख कोटी रुपये हे चालू वर्षांतील एप्रिलनंतरच्या पाच महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठणारेही ठरले आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता अर्थव्यवहार गतिमान झाले असून, त्याचेच प्रत्यंतर म्हणून कर महसुलात वाढ होत आहे.

सरकारचे महसुली उत्पन्न महिना दर महिना वाढत असून ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यामध्ये वाढीव जीएसटी संकलन झाले. ऑगस्ट महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत १.१२ लाख कोटी रुपये आले होते. ते प्रमाण सप्टेंबरमध्ये १,१७,०१० लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून, अर्थचक्र गतिमान झाल्याचे आणि मागणीत वृद्धी झाल्याचे हे निदर्शक असल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ९५,४८० कोटी रुपये जीएसटीच्या माध्यमातून मिळाले होते, त्या तुलनेत यंदा गोळा झालेल्या जीएसटीत २३ टक्के वाढ झाली आहे.

सप्टेंबरमधील जीएसटी संकलन हे एप्रिलनंतर सर्वाधिक वाढले आहे. एप्रिल महिन्यात विक्रमी १.४१ लाख कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला होता. आगामी महिन्यांमध्येही जीएसटीचा महसूल असाच जोमदार असेल, असा विश्वास अर्थमंत्रालयाने व्यक्त केला आहे.

सप्टेंबरमधील १,१७,०१० कोटी रुपये एकूण जीएसटी महसुलात केंद्रीय जीएसटीचा वाटा २०,५७८ कोटी रुपये इतका आहे तर राज्यांनी वसूल केलेल्या जीएसटीचा वाटा २६,७६७ कोटी रुपये इतका आहे. तर एकात्मिक जीएसटीपोटी ६०,९११, कोटी रुपये मिळाले आहेत. आयात केलेल्या वस्तूंवर आकारण्यात आलेल्या २९,५५५ कोटी रुपयांच्या जीएसटीचा समावेश आहे, तर ८,७५४ कोटी रुपयांच्या उपकराची वसुली झाली आहे. यात आयात वस्तूंवर आकारण्यात आलेल्या ६२३ कोटी रुपयांच्या उपकराचा समावेश आहे. जुलै-सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत सरासरी मासिक जीएसटी संकलन १.१५ लाख कोटी रुपये झाले आहे, जे चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील १.१० लाख कोटी रुपयांच्या मासिक सरासरी संकलनापेक्षा ५ टक्के अधिक आहे.