नवी दिल्ली : वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) जुलै महिन्यात १.१६ लाख कोटींचा महसूल जमा झाला. यामुळे करोनाची दुसरी लाट ओसरत असताना अर्थव्यवहार गतिमान झाल्याचे चित्र दिसत आहे.

वस्तू व सेवा कराच्या संकलनात गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत यंदाच्या जुलैमध्ये ३३ टक्के वाढ होऊन ते १.१६ लाख कोटी रुपयांवर गेले. जुलै २०२० मध्ये ही रक्कम ८७,४२२ कोटी रुपये होती.

जुलै महिन्यातील करसंकलनाची रक्कम ही चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची आहे. एप्रिल महिन्यात १.४१ लाख कोटी रुपयांचा विक्रमी महसूल गोळा झाला होता. येत्या महिन्यांमध्येही जीएसटीचा महसूल असाच जोमदार असेल, असा विश्वास अर्थमंत्रालयाने व्यक्त केला आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विविध राज्यांनी टाळेबंदी लागू केल्यामुळे आर्थिक व्यवहार थंडावले होते. मात्र, जुलैमध्ये जीएसटी संकलनात वाढ झाल्याने अर्थव्यवहार पूर्वपदावर येत असल्याचे मानले जाते.