देशाच्या मुख्य अर्थसल्लागारांकडून दर फेर-सुसूत्रतेचे सूतोवाच

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या दर रचनेच्या नव्याने सुसूत्रीकरणाचा मुद्दा केंद्र सरकारच्या विषयपत्रिकेवर असून, त्या संबंधाने निश्चितच काही तरी निर्णय घेतला जाईल, असे सूतोवच देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमणियन यांनी गुरुवारी केले.

तीन टप्प्यांची दर रचना ही अत्यंत महत्त्वाची असून, व्यस्त शुल्क रचनेची गुंतागुंतही लवकरात लवकर निकाली काढली जायला हवी, असे मत सुब्रमणियन यांनी नमूद केले. ‘जीएसटी’चे सध्या ०.२५ टक्के, ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असे वेगवेगळे पाच दर प्रकार असून, त्याऐवजी तीनच दर असायला हवेत, असे त्यांनी ‘अ‍ॅसोचॅम’द्वारे दूरचित्रसंवाद माध्यमाद्वारे आयोजित कार्यक्रमात बोलताना स्पष्टपणे सूचित केले.

केंद्रातही या संबंधाने विचारविमर्श असून, लवकरच ठोस काहीतरी घडताना निश्चितच दिसेल. जीएसटीची मूळ संकल्पनाही तीन टप्प्यांतील दरांचीच होती. परंतु बऱ्याचदा धोरणे आखली जात असताना, परिपूर्णतेच्या प्रयत्नात इच्छित उत्कृष्टता साधण्यात अडचणी येतच असतात, हेही लक्षात घ्यायला हवे, असे ते म्हणाले. सध्याच्या पाच पदरी दर रचना ही उत्कृष्टच आहे आणि याची पावती गोळा होत असलेला एकूण कराची रक्कम दाखवते. त्यामुळे याचे समर्पक श्रेय धोरणकर्त्यांना द्यायलाच हवे, अशी पुस्तीही सुब्रमणियन यांनी जोडली.