‘जीएसटी’ वाहन कंपन्यांच्या पथ्यावर

जुलैमध्ये वाहन विक्रीत दुहेरी अंकाने वाढ

जुलैमध्ये वाहन विक्रीत दुहेरी अंकाने वाढ

वस्तू व सेवा करप्रणाली अर्थात जीएसटीमुळे कमी झालेल्या वाहनांच्या किमती उत्पादक कंपन्यांच्या पथ्यावर पडल्या आहेत. जुलैमध्ये मारुती सुझुकीसह अनेक कंपन्यांच्या विक्रीत दुहेरी अंकवाढ नोंदली गेली आहे.

जुलैमध्ये वस्तू व सेवा करप्रणाली लागू होण्यापूर्वी वाहन उत्पादकांनी वाहन खरेदीवर घसघशीत सूट-सवलत दिली होती. ही सवलत काही हजारांपासून होती. त्याचा योग्य तो परिणाम जूनमधील विक्रीद्वारे दिसून आला होता.

जुलैमध्येही तसेच घडले आहे. वस्तू व सेवा करप्रणालीमुळे वाहनांच्या किमती गेल्या महिन्यांपासून काही प्रमाणात स्वस्त झाल्या. त्यामुळे खरेदीदार पुन्हा एकदा आकृष्ट झाल्याचे दिसून आले आहे.

वाहन विक्रीबाबत देशातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने जुलैमध्ये २०.६ टक्के वाढ नोंदविताना १,६५,३४६ वाहने विकली आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीच्या १,३७,११६ वाहनांची विक्री झाली होती. कंपनीने या रूपात यंदा सर्वोत्तम मासिक वाहन विक्री राखली आहे. मारुतीची यापूर्वीची १,४४,४९२ अशी महिन्यातील सर्वाधिक वाहन विक्री एप्रिल २०१७ मध्ये नोंदली गेली होती. कंपनीची देशांतर्गत वाहन विक्री जुलैमध्ये २२.४ टक्क्यांनी वाढली आहे.

जुलैमध्ये फोर्ड इंडियाने ४६.९६ टक्के वाढ नोंदविताना २६,०७५ अशी एकूण वाहन विक्री राखली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीच्या १७,७४२ वाहनांची विक्री झाली होती. कंपनीची देशांतर्गत विक्री जवळपास १९ टक्क्यांनी वाढली आहे. तर निर्यात ६५.५४ टक्क्यांनी झेपावली आहे.

अन्य कंपन्यांच्या तुलनेत टाटा मोटर्सला गेल्या महिन्यात केवळ ७ टक्के एकूण वाहन विक्रीतील वाढ राखता आली आहे. कंपनीच्या ४६,२१६ वाहनांची विक्री जुलै २०१७ मध्ये झाली. तर देशांतर्गत बाजारपेठेत कंपनीच्या वाहन विक्रीतील वाढ १३.२ टक्के राहिली आहे. यामध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीतील वाढ १०.२३ टक्के आहे.

टाटा मोटर्सप्रमाणेच तिची स्पर्धक महिंद्र अँड मिहद्रनेही जुलैमध्ये अवघ्या ७.२९ टक्के वाढीचा वाहन विक्रीतील प्रवास नोंदविला आहे. कंपनीने गेल्या महिन्यात १८,८३२ वाहने विकली. यामध्ये १७,६८२ वाहनांचा समावेश देशांतर्गत बाजारपेठेतील राहिला. तर निर्यातीत ४.४ टक्के वाढ झाली.

अवजड वाहननिर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या अशोक लेलँडच्या वाहन विक्रीत गेल्या महिन्यात १४.१९ टक्के वाढ झाली असून कंपनीने जुलैमध्ये ११,९८१ वाहने विकली आहेत. जुलै २०१६ मध्ये कंपनीच्या १०,४९२ वाहनांची विक्री झाली होती.

एक्सॉर्ट्स लिमिटेडच्या ट्रॅक्टर विक्रीत जुलैमध्ये ३४.३ टक्के वाढ होऊन वाहन विक्री ५,४१८ झाली आहे. कंपनीची देशांतर्गत वाहन विक्री ५,२७५ आहे. तर निर्यात १४३ वाहने अशी राहिली आहे.

दुचाकी वाहन निर्मिती क्षेत्रातील सुझुकी मोटरसायकलच्या विक्रीत जुलैमध्ये ६२ टक्के वाढ झाली असून या कालावधीत कंपनीच्या ४०,०३८ दुचाकी विकल्या गेल्या आहेत. कंपनीने जुलै २०१६ ध्ये विक्री केलेल्या एकूण वाहनांची संख्या २४,७०३ होती. टीव्हीएस मोटर कंपनीच्या विक्रीत ९.३४ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात एकूण २,७१,१७१ दुचाकी विक्री केली आहे. तर हिरो मोटोकॉर्पची विक्री १७.१३ टक्क्यांनी वाढून ६,२३,२६९ झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gst impact on vehicle sales

ताज्या बातम्या